शब्दा–शब्दामध्ये अर्थ भरलेला असतो, ” न्यूड ” हा शब्द ऐकल्यावर – वाचल्यावर डोळ्यासमोर एक चित्र उभं रहाते, ह्या शब्दामध्येच खोलवर अर्थ दडलेला आपल्याला जाणवतो. पण ” न्यूड ” हा शब्द चित्रकला, पेंटिंग, मॉडेल इत्यादी बरोबर निगडित आहे पण वास्तवतेचा विचार केला तर हा शब्द आपल्याला अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो, हाच धागा पकडून ” न्यूड ” चित्रपटाकडे बघायला हवे.
झी स्टुडिओ प्रस्तुत, आणि अथांग कम्युनिकेशन ह्या चित्रपट संस्थेच्या सहयोगाने ” न्यूड ” चित्रपटाची निर्मिती केली असून निर्मात्या मेघना जाधव ह्या आहेत. दिगदर्शन रवी जाधव यांचे लाभले आहे. झी स्टुडिओ चे बिसनेस हेड मंगेश कुलकर्णी हे आहेत. कथा रवी जाधव, पटकथा – संवाद सचिन कुंडलकर यांचे आहेत. छायाचित्रण अमलेंदू चौधरी, वेशभूषा मेघना जाधव, संकलन अभिजित देशपांडे, गीते सायली खरे, पार्श्वसंगीत सौरभ भालेराव यांचे असून या मध्ये कल्याणी मुळ्ये, छाया कदम, ओम भुतकर, मदन देवधर, नसरुद्दीन शहा, श्रीकांत यादव, नेहा जोशी, किशोर कदम, हे कलाकार असून प्रत्येकाची भूमिका त्यांनी मनापासून समरसतेने केलेली आहे.
न्यूड चा विषय हा वेगळा असून त्याची कथा भावनिक अशी आहे, एका यमुनाबाई नावाच्या आई भोवती ही कथा फिरत रहाते, आपल्या मुलाने शिकावे हि तिची प्रामाणिक इच्छा असते त्यासाठी ती कष्ट करायला तयार असते. तिचा संसार हा एका गावात असतो, पण तिचा पहिलवान नवरा एका दुसऱ्या बाईच्या नादी लागलेला असतो, त्या बाईच्या साठी तो यमुनेच्या बांगडया – पैसे सारे हिरावून घेतो त्याच्या त्रासाला कंटाळून यमुना आपल्या मुलाला घेऊन मावशीकडे मुंबईला येते. मावशी रोज सकाळी कामावर जाते, आपल्याला हि नोकरी शोध असे यमुना मावशीला सांगते, मावशी त्याला प्रतिसाद देत नाही, एक दिवस यमुना मावशी कुठे कामाला जाते हे शोधून काढते, मावशी सर जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये नोकरी करीत असते, पण तिथे ती नेमके काय काम करते ह्याचा छडा यमुना लावते, मावशी तेथे वेगळ्या प्रकारचे अर्थात न्यूड मॉडेलिंग करीत असते, तेथे चित्रकला शिकायला आलेली मुलं हि तिला बघून चित्र काढत असतात, पण त्यांची नजर हि वखवखलेली नसते, त्यांचा तो अभ्यासाचा भाग असतो, ते शिक्षणाचं काम आहे,,,, असं सगळं मावशी यमुनेला खरं खरं काय ते सांगते, आणि घरी सांगू नकोस असे बजावते,
यमुनेला सुद्धा आपल्या मुलाला शिकवायचे असते, मुलाला नेमकी चित्रकलेची आवड असते, आणि पुढचा धोका ओळखुन यमुनाबाई शिक्षणासाठी आपल्या मुलाला परगावी पाठवते. आणि ती सुद्धा मावशी बरोबर “त्या ” कामाला सुरवात करते. कालांतराने मुलगा परगावाहून मुंबईला परत येतो, चित्रकला शिकायची नाही असे ठरवतो, नोकरी करतो, पण एक दिवस तो ” न्यूड ” चित्रांचे प्रदर्शन बघायला जातो आणि शेवटी नेमकं काय होते ह्याचे उत्तर शोधायला आपल्याला सिनेमा पाहायला हवा,,,, चित्रपटातील सर्वच कलाकारांची कामे उत्तम झालेली आहेत, संगीत – छायाचित्रण – ह्या जमेच्या बाजू आहेत. हा सिनेमा संयमाने /वास्तवतेची जाणीव करून देताना अंतर्मुख करायला लावतो. ,,,,
चित्रकला ह्या विषयावर चित्रपटाची कथा बेतलेली आहे, चित्रकला शिकवणाऱ्या कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षाला त्या विध्यार्थ्यांना ” न्यूड ” चित्रे समोर ” मॉडेल ” बसवून काढायची असतात, हि मॉडेल्स ” स्त्री आणि पुरुष ” अशी असतात. हि चित्रे साकारताना चित्रकार त्या मॉडेलच्या शरीराकडे बघत नाही तो त्यातील आत्मा शोधीत असतो, चित्रकार मॉडेलचे चित्र काढीत असतो त्यावेळी तो त्याच्या कल्पनेप्रमाणे गावातील / शहरातील बाई रेखाटत असतो, त्यासाठी समोरचे मॉडेल हे फक्त एक शरीर असते, कल्पना फक्त चित्रकाराच्या असतात. आणि त्यातून त्याची प्रतिभा कळते. चित्रकाराची दृष्टी हि फक्त शिक्षण घेण्याची असते.
हा सिनेमा वेगवेगळे विचार मांडतो, कलेकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय हा महत्वाचा विचार आहेच. यमुनाबाई हि आई आहे तिची जीवन कथा मांडली आहे, त्याचप्रमाणे चित्रकलेकडे बघण्याचा सामान्य माणसाचा दृष्टिकोन कोणता आहे ह्यावर सिनेमा कळत न कळत भाष्य करतो, आपण बऱ्याच वेळा एखादे चित्र बघून त्याच्या मागे काय विचार असेल हे न बघताच आपण आपले मत देतो, त्यावर सुद्धा विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे.
Leave a Reply