शाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या “शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला” या नाटकानं ६९९ प्रयोगांचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा गौरवशाली ७०० वा प्रयोग २१ मे रोजी यशवंतराव नाट्यगृह,माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. या प्रयोगाला अभिनेता आमीर खान आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित राहणार आहेत. सारा एंटरटेन्मेंट, रंगमळा आणि विद्रोही शाहिरी जलसा यांनी हा प्रयोग आयोजित केला आहे.
“शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला” हे नाटक २०१२ मध्ये रंगभूमीवर आलं होतं. त्यानंतरच्या सहा वर्षांत या नाटकानं ७०० प्रयोगांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. राजकुमार तांगडे लिखित या नाटकाचं दिग्दर्शन नंदू माधव यांनी केलं आहे. कैलास वाघमारे, मीनाक्षी राठोड, संभाजी तांगडे, प्रवीण डाळींबकर, अश्विनी भालेकर, मधुकर बिडवे, राजू सावंत, श्रावणी तांगडे आदींच्या यात भूमिका आहेत. शाहीर संभाजी भगत यांनी नाटकाची संकल्पना, गीत, संगीत केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरून कशा पद्धतीनं राजकारण केलं जातं, या स्फोटक विषयावर अतिशय संयत आणि विचारपूर्वक भाष्य या नाटकात दर्शविले आहे.
‘कोणत्याही नाटकाचे ७०० प्रयोग होणं ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्या संपूर्ण टीमनं केलेल्या कष्टांची ही परिणिती आहे. या ७०० व्या प्रयोगाला आमीर खान आणि नागराज मंजुळे हे संवेदनशील कलाकार उपस्थित राहणार आहेत, याचा विशेष आनंद आहे,’ असं निर्माता भगवान मेदनकर यांनी सांगितलं
Leave a Reply