लग्नानंतर आपले अस्तित्व विसरून फक्त नी फक्त तिच्या कुटुंबासाठी वावरणाऱ्या स्त्री ची कहाणी तर सर्वांनाच माहित आहे. आपल्या इच्छा आकांक्षा विसरून फक्त नी फक्त कुटुंबाच्या जबाबदारीत गुरफटून राहायचे, घर, नवरा,आपली मुले यातच आपले सुख आहे हेच या गृहिणीला कळत असते. आपल्या इच्छांची एक बकेट लिस्ट आहे हे तिला माहीतच नसते. सासू सासरे, नवरा आणि मुले यातच तिची बकेट लिस्ट पूर्ण होते. ‘बकेट लिस्ट’ मधील मधुराचेही तेच आहे.
या सिनेमातील मधुराचे हि असेच आयुष्य आहे. मधुरा सानेचीही स्वत:ची बकेट लिस्ट नसते. रोज सकाळी उठायचं आणि नवरा-मुलं-सासू-सासरे यांच्यासाठी एकच भाजी चार पद्धतीने करायची, हाच तिचा रोजचा जीवनक्रम असतो. त्यात ती सुखी-समाधानीही असते,… मात्र एक दिवस अचानक तिच्या आयुष्यात सई येते आणि तिचं आयुष्यच बदलून जातं. ती स्पोर्ट्स बाइक चालवायला लागते, ती पबमध्ये जाऊन फूल टू दंगा मस्ती करते, तिथे तिला रणबीर भेटतो, पबमधील किचन मधील धम्माल, शॉर्ट् ड्रेस घालते, मस्त स्टायलाइज्ड राहते. वयाच्या एकविशीपर्यंत सर्वसाधारण मुलींना परंपरेच्या विरोधात जे जे काही करावंसं वाटतं, ते ती करते. या गोष्टी करता करता ती सईच होऊन जाते. कारण या सगळ्या गोष्टी असतात सईच्या डायरीतील बकेट लिस्टमधल्या. सईची ही बकेट लिस्ट सईऐवजी मधुराच पूर्ण करते आणि त्या गोष्टी पूर्ण करता-करता तीच स्वत:ला नव्याने सापडते.
आता ही सई कोण, ती माधुरीच्या आयुष्यात का येते आणि तिची बकेट लिस्ट माधुरी का पूर्ण करते? तिच्या या बकेट लिस्ट च्या पूर्णत्वाच्या इच्छेसाठी तिला तिच्या कुटुंबाची मदत होते का? असे प्रश्न पडले असतील, तर त्याची उत्तरं सिनेमा पाहताना मिळतील.
माधुरी दीक्षितचं मराठीतलं पहिलं पाऊल असलेला ‘बकेट लिस्ट’ हा सिनेमा ‘सबकुछ माधुरी’ तर आहेच. पहिल्या मराठी सिनेमात माधुरी तिच्या चाहत्यांच्या नक्की लक्षात राहील. सुमित राघवन नवऱ्याच्या भूमिकेला न्याय देऊन गेला आहे. सोबतच वंदना गुप्ते, प्रदीप वेलणकर, रेणुका शहाणे, मिलिंद फाटक, इला भाटे, दिलीप प्रभावळकर यांच्याही भूमिका खास आहेत आणि ते लक्षात राहतात. रेशम टिपणीसने मैत्रिणीच्या भूमिकेला धमाल केलीय. रणबीर कपूर चा गेस्ट अपिअरन्स तेवढाच वेगळा आहे. सईचा भाऊ सुमेध मुद्गलकर मात्र जास्त आक्रमक दाखवला गेलाय, तितकी गरज त्या भूमिकेला नव्हती.
करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’चा सिनेमा असल्यामुळे याची निर्मिती उत्तम. सिनेमात वेगळे असे काही नाही. पण माधुरी नक्कीच तिच्या चाहत्यांना आनंद देऊन जाईल. दुसऱ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी हि जगणे आणि मनाला बरेच काही सांगून जाणारा हा सिनेमा आहे.
आम्ही देतोय
सारिका कामतेकर
Uttam likhan…..
LikeLike