‘झी टीव्ही’वरील लहान मुलांमधील नृत्यकौशल्याचा शोध घेणार््या ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’ या रिअॅलिटी कार्यक्रमात गेल्या अनेक आठवड्यांपासून ब्लॉकबस्टर बच्चे आपल्या अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. आता स्पर्धेच्या या टप्प्यात प्रेक्षकांनी केलेले मतदान आणि श्रोत्यांच्या मताला महत्त्व प्राप्त झाले असल्यामुळे परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी टॉप 9 स्पर्धक अटीतटीचा प्रयत्न करीत आहेत.
आज वीकेण्डच्या भागात या कार्यक्रमातील ब्लॉकबस्टर बच्चे आपल्या दमदार नृत्यशैलीने केवळ चित्रांगदा सिंह, मार्झी पेस्तनजी आणि सिध्दार्थ आनंद या तीन परीक्षकांवरच नव्हे, तर बॉलीवूडचा दणकट हिरो जॉन अब्राहमवरही आपल्या पदन्यासाची जादू टाकतील. आपल्या परमाणू या आगामी चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी जॉन अब्राहम या वीकेण्डच्या कार्यक्रमात सहभागी होणार असून या बालनर्तकांची जोशपूर्ण आणि दणकेबाज नृत्ये पाहून तोसुध्दा भारावून गेला.
वीकेण्डच्या भागाचा प्रारंभही दणकेबाज झाला. एपी रॉकर्स या स्पर्धकांनी आपल्या अद्वितीय आणि चापल्यपूर्ण पदन्यासाने सर्व प्रेक्षक आणि परीक्षकांचे डोळे आपल्यावरच खिळवून ठेवले. एपी रॉकर्सने ‘मौला मेरे लेले मेरी जान’ या गाण्यावर ‘क्रम्प्स’ आणि समकालीन अशा नृत्यशैलीचे मिश्रण करूनसादर केलेला नृत्य हे प्रेक्षणीय ठरले! त्यांचे हे नृत्य पाहून मद्रास कॅफे चित्रपटाचा हा नायक अगदी भारावून गेला होता आणि त्यांची त्याने तोंडभरून प्रशंसा केली. जॉन म्हणाला, “तुम्ही मुलं अफलातून नाचलात आणि तुमचं सादरीकरणही राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेलं होतं. मला तुम्हाला माझी एक गोष्ट सांगाविशी वाटते आहे. तुम्ही जर माझं कपड्यांचं कपाट उघडलंत तर तुम्हाला त्यात दोन टी–शर्टस, दोन जीन्स पॅण्ट, हेल्मेट, जॅकेट आणि एक तिरंगा झेंडा दिसेल. त्याकडे बघून मला विधायक प्रेरणा मिळते, त्यामुळे मी कधी कधी उगाचंच माझं कपाट उघडतो.”
तो म्हणाला, “लोक मला सांगत की मी चालण्यापेक्षा बाईक अधिक चांगली चालवतो.” याशिवाय जॉनने आपल्या तंदुरुस्तीचे रहस्य सांगताना सांगितले की तंदुरुस्त आणि ताकदवान राहण्यासाठी आपण दररोज निदान 30-40 अंडी खातो!
त्यामुळे आजचा भाग म्हणजे धम्माल उडवणारा असेल.
Leave a Reply