शिवाजी महाराजांनी केलेल्या अफझलखानाच्या वधानंतर अवघ्या अठरा दिवसात पन्हाळा स्वराज्यात दाखल झाला होता. पण पुढे सिद्धी जोहरच्या स्वारीच्या वेळी तो विजापूरकरांना परत करावा लागला आणि तेव्हा पासून सुमारे तेरा वर्षे पन्हाळा स्वराज्यात नव्हता. दरम्यान, विजापूरकरांचा पन्हाळा परिसरात जुलूम वाढत चालला होता. राज्याभिषेकाच्या आधीच पन्हाळा स्वराज्यात यावा अशी महाराजांची इच्छा होती. आणि पन्हाळा जिंकण्यासाठी त्यांना कोंडाजी फर्जद याची मदत कशी झाली हेच या सिनेमातून दाखविण्यात आले आहे.
स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. भौगोलिक आणि संरक्षणाच्या दृष्टीने पन्हाळा गडाचे महत्त्व, महाराजांचा राज्याभिषेक, पन्हाळा गडाच्या आसपास असलेल्या सामान्य जनतेवरील वाढता अन्याय या सगळ्या गोष्टी महराजांच्या प्रतिष्ठेच्या झाल्या होत्या. या साऱ्या परीस्थितीत पन्हाळा जिंकणे हे महाराजांसाठी अतिशय महत्त्वाचे होते. महाराजांच्या शिकस्तेत अनेक वीर मावळे झालेत. तानाजी मालुसरे, अनाजी पंत, बहिर्जी नाईक. त्यातील एक वीर मावळा म्हणजे फर्जद. पन्हाळा जिंकायचाच आणि जनतेला या दुश्मनापासून वाचवायचं हेच महाराजांच्या मनात चालले होते. आणि या पन्हाळा किल्ला जिंकण्याची जबाबदारी अनाजी पंत यांवर सोपवण्यात येते. पण, काही गोष्टी अवघड वाटू लागणार इतक्यातच महाराजांना बहिर्जी नाईक यांची आठवण येते आणि त्यांच्या सोबतच कोंडाजी फर्जद. या दोघांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा जिंकण्यासाठी महाराज त्यांना पाच हजार मावळ्यांची फौज देतात. ‘फर्जंद’ या आपल्या धाडसी वाघावर महाराजांनी ही जबाबदारी सोपवली. ‘आपण फकस्त लडायचं.. आपल्या राजांसाठी… आन् स्वराज्यासाठी’…! असं म्हणत पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धयाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती. गनिमी काव्यानेच गड जिंकायचा असा मनसुबा धरत सगळे मावळे गडावर स्वर करतात आणि दुश्मनांना चीतपट करत पन्हाळा गड जिंकतात.
‘फर्जद’ या सिनेमात शिवकालीन युद्धनीती, गनिमी कावा कौशल्य नीती आणि वीर मावळ्यांची स्वराज्याप्रती आणि महारांजाप्रती असलेली भावना दर्शवलेली आहे. ह्या सिनेमात दहा / अकरा लढाया आहेत, त्यामध्ये प्रत्येक लढाईची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येक मावळ्याकडे वेगवेगळे शस्त्र आहे. सिनेमाचे दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. कोंडाजी फर्जद हि मुख्य भूमिका अंकित मोहन याने साकारली असून त्याने फर्जद या वीर मावळ्याला आपल्यासमोर जिवंत केलेय. चिन्मय मांडलेकर [ शिवाजी महाराज ], मृणाल कुलकर्णी [ जिजाऊ ], प्रसाद ओक [ बहिर्जी नाईक ]., अजय पुरकर [ मोत्याजी मामा ], प्रवीण तरडे [ मारत्यारामोशी ]., निखिल राऊत [ किसना ], अशा प्रत्येकाच्या भूमिका लक्षांत राहतात. चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार हे असून सहनिर्माते संदीप जाधव,महेश जाउरकर, स्वप्नील पोतदार हे आहेत, कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव हे आहेत, छायाचित्रणाची जबाबदारी केदार गायकवाड यांनी सांभाळलेली असून लेखन -पटकथा – संवाद आणि दिगदर्शन दिगपाल लांजेकर यांचे आहे. गीते दिगपाल लांजेकर, क्षितिज पटवर्धन यांचे असून संगीत अमितराज आणि दिले आहे. यामधील साहस दिगदर्शन प्रशांत नाईक यांनी केलं असून कला दिगदर्शन हे नितीन चंद्रकांत देसाई यांचे लाभले आहे. उत्तम सादरीकरणाने प्रगल्भ असा हा सिनेमा इतिहासातील अजून एका सोनेरी पानाची आठवण करून देतो
.दिनानाथ घारपुरे.
Leave a Reply