आजच्या टेक्नोसॅव्ही काळातल्या मुलांना लपंडाव, गोट्या,भोवरा, विटी-दांडू, आट्या-पाट्या हे जुने खेळ जणू यात काय विशेष..! असंच वाटेल, पण त्यात एक गंमत असायची. या खेळांची माहिती नसल्याने तो आनंद ही त्यांनी अनुभवला नाही म्हणूनच हा आनंद अनुभवता यावा यासाठी निर्माते जय केतनभाई सोमैया आणि दिग्दर्शक भगवान वसंतराव पाचोरे यांनी ‘गोट्या’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आणला आहे. ‘गोटया’हा मराठी चित्रपट ६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना ‘क्लिक’ झाली तर चित्रपट आपोआप प्रेक्षकांपर्यंत पोहचतो हे लक्षात घेऊनच संगीताचा हटके अंदाज हल्ली चित्रपटांमध्ये सर्रास दिसू लागला आहे. ‘गोट्या’खेळातील वेगवेगळ्या गमतीच्या भावछटा रेखाटत मनाला भिडतील अशी वेगवेगळ्या जॅानरची पाच गीते संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गोट्या चित्रपटासाठी संगीतबद्ध केली आहेत. रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला पार्श्वसंगीत दिलं आहे. भगवान पाचोरे लिखित ‘चला सारे जग जिंकूया’, ‘ढाय लागली’, ‘गोल गोल गोटीचा गोल’ ‘गोटीवर गोटी’, ‘ढाय लागली’ रिमिक्स या पाच गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, बेला शेंडे, आदर्श शिंदे, जसराज जोशी, कौस्तुभ गायकवाड, आकाश आगलावे यांचा स्वर लाभला आहे.
‘गोटया‘ या शीर्षकावरून या सिनेमाची कथा एखाद्या लहान मुलाभोवती गुंफण्यात आली असावी असा अंदाज लावला जाणं साहजिक असलं तरी हा सिनेमा पूर्णतः ‘गोटया’ या खेळावर आधारित आहे. शीर्षकाप्रमाणेच गोटयांचा खेळच खऱ्या अर्थाने या सिनेमाचा नायकही आहे. नैनेश दावडा आणि निशांत राजानी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
Leave a Reply