महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व आणि आपल्या बहुआयामी लिखाणाने अजरामर झालेले साहित्यिक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु. ल. देशपांडे यांच्यावरील चित्रपटाची घोषणा सोमवारी करण्यात आली.
महेश मांजरेकर मुव्हीज, फाळकेज् फॅक्टरी- अ फिल्म मॅनेजमेंट कंपनी आणि ग्रेट मराठा एंटरटेन्मेंट कंपनी यांच्यातर्फे या चित्रपटाची प्रस्तुती केली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शनही महेश मांजरेकर करत आहेत. चित्रपटात भाई अर्थात पु. ल. देशपांडे यांची भूमिका सागर देशमुख तर सुनीताबाईंची भूमिका इरावती हर्षे साकारत आहेत. या चित्रपटाची पटकथा गणेश मतकरी यांची असून ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. रंगभूषेतील कौशल्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले विक्रम गायकवाड रंगभूषेतून अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांना चेहरा देणार आहेत.
यामध्ये पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे यांच्याबरोबरच जवाहरलाल नेहरू, बाळासाहेब ठाकरे, बाबा आमटे, भीमसेन जोशी, दुर्गा भागवत, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. या भूमिका साकारण्यासाठी प्रथितयश आणि अभ्यासू कलाकारांची निवड झालेली आहे.
२०१९ मध्ये हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
Leave a Reply