काही नाटकं, काही कलाकृती ज्या रंगभूमीला कायमस्वरुपी योगदान देतात. त्यातीलच एक म्हणजे ‘संगीत देवबाभळी’. आज रंगभूमीवर ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आजवर अनेक पारितोषिकांवर या नाटकाने आपले नाव कोरले आहे.
राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार या नाटकानं पटकावला. सेलिब्रेटी कलाकारापेक्षाही संहिता, अभिनय आणि संगीत यादेखील जमेच्या बाजू आहेत, हे या नाटकाने सिद्ध केलेय. याच नाटकातील दोन माऊली रखुमाई – आवली अर्थात मानसी जोशी – शुभांगी सदावर्ते हिच्याशी मारलेल्या गप्पा..
मानसी, तुझी नाट्यसृष्टीत सुरुवात कशी झाली आणि संगीत नाटकांचा अनुभव काय होता
२००३ मध्ये मी अथर्व थिएटर्स चे ‘संगीत लग्नकल्लोळ’ हे नाटक केले. संगीत लग्नकल्लोळ हे देखील साधारण याच पठडीतले नाटक होते. आधीच्या नाटकांना छेद देण्यासाठी त्याने काहीतरी वेगळेपण म्हणून संगीत ठेवले. पण, संगीत देवबाभळी हे नाटक पूर्णपणे वेगळे आहे. या नाटकात गाणं किंवा संगीत नाटकाला पुढे घेऊन जाते. गाणं सुरु झाल्यावर संहिता कुठेही थांबत नाही. नाटकाचा वेग कुठेही थांबत नाही. हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे.
या भूमिकेबद्दल काय सांगशील?
मी यात रुक्मिणीची भूमिका करतेय. या भूमिकेला अनेक भावना आहेत, अनेक भावनांमधून ती जाते, राग,प्रेम, वेदना, कुतूहल, काळजी अशा वेगवेगळ्या भावनांचा आलेख आहे. या सगळ्याच भावना मला प्रेक्षकापर्यंत पोहोचावायाच्या आहेत. त्यामुळे मला हि भूमिका करताना आनंद होतो.
तुझे पुढील प्लान काय आहे?
मी सध्या एका नाटकावर काम करतेय. भारताच्या पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी या भूमिकेवर काम करतेय. हे साधारण दीड तासाचे एकपात्री आहे, जे गुजराती, हिंदी आणि मराठी अश्या भाषांमध्ये सादर होत आहे. याचे आम्ही प्रयोग करत आहोत.
शुभांगी, तुझा नाट्यप्रवेश कसा झाला?
संगीत देवबाभळी हि एकांकिका प्रचंड गाजली. याच पहिल्या एकांकिकेतून मी नाट्यसृष्टीत आले. एकांकिकेला स्पर्धामधून पारितोषिकेही मिळालीत. एकांकिकेत मी आवलीची भूमिका करत होते. हि एकांकिका प्रसाद दादाने पाहिली, त्याला एकांकिका आवडली, एक वेगळा विषय त्यातूनही संगीताचा बाज. त्यामुळे ती एकांकिका नाटकस्वरुपात आणावी असे त्याला वाटले आणि याला व्यावसायिक नाट्याचे रूप आले आणि आवलीची भूमिका व्यावसायिक रंगभूमीवर आली.
तू संगीत शिकली आहेस का?
सर्वात आधी मी गायिका आहे. मी संगीतात बी.ए. केले आहे. माझे गाण्याचे शिक्षण सुरु आहे. मला गाणं येतं पण अभिनय येत नव्हता. पण अभिनय करून घेता येऊ शकतो, पण गाणं म्हणणे कठीण आहे. या सगळ्यातून मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली.
एकांकिका आणि नाटक यात अवली मध्ये काही फरक आहे का?
हो. बराच फरक आहे. एकांकिका करताना आवली च्या भूमिकेला ठळक दाखवण्यात आले होते. पण नाटकात मात्र, रुक्मिणी आणि आवली दोन्ही प्रकर्षाने प्रेक्षकांना दाखवण्यात आल्या आहेत. दोघींच्या मनातील विठ्ठलाप्रती असणाऱ्या भावना यात दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुक्मिणी आणि आवली या दोन्ही भूमिका तितक्याच महत्वाच्या आहेत.
या भूमिकेसाठी तुझा वेगळा अभ्यास होता का
नाही. आवली हि भूमिका खूप सजीव आणि नैसर्गिक आहे. मुळात दिग्दर्शकाने सांगितले होते, कि यात तू आवली करता करता स्वतःसोबत आवालीला अनुभवायचे आहेस. त्यामुळे या भूमिकेसाठी मी वेगळा अभ्यास केला नाही. हि आवली साकारताना मला कठीण जात होतं तिचे आयुष्य जगायला. पण तितकेच समाधान हि होते गेले. मी स्वतःमध्ये आवलीला पाहिले.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या भूमिकेला प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळते हीच पोचपावती आहे.
श्रीकांत वावदे
Leave a Reply