माणूस,,,, प्रत्येक माणसाची ओळख हि त्याच्या कामाने होत असते,कमी बोलणारी माणसे हि त्यांच्या कामातून व्यक्त होतात. ओळखी बरोबर समाजात होणारे बदल सुद्धा त्यांनी लक्षांत घेतले पाहिजेत. अश्या ह्या मध्यवर्ती आशयावर लेथ मशीन ची निर्मिती निर्माते सोनाली जोशी, मंगेश जोशी यांनी केली असून प्रस्तुती अमोल कांगणे स्टुडिओज ची आहे. चित्रपट प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओज च्या सहकार्याने करण्यात आली असून कथा-पटकथा-दिगदर्शन मंगेश जोशी यांचे आहे. छायाचित्रण सत्यजित श्रीराम यांचे असून संकलन मकरंद डंभारे यांनी केलं आहे. या मध्ये चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, ओम भुतकर सेवा चौहान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
माणूस आणि मशीन ची कथा यामध्ये गुंफली आहे. माणूस आपल्या विविध उपयोगासाठी वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी वापरतो आणि मग तो त्या मशीनचाच एक भाग होऊन जातो, त्याची ओळख सुद्धा त्या मशीनच्या नावाने होते. जोशी कुटुंबाची कथा ह्यामध्ये असून जोशी हे एका वर्कशॉप मध्ये लेथ मशीन वर उत्तम काम करीत असतात, त्यांची ओळख ” लेथ जोशी ” ह्या नावाने होऊन जाते. ३५ वर्षे काम केल्यावर त्यांना नोकरीतून काढून टाकले जाते, जोशी यांना फक्त लेथ मशीनची माहिती असते, उ त्याच्या पुढील जग पाहिलेले नसल्याने त्यांची पुढे फार पंचाईत होते, आजचे तंत्रज्ञान हे प्रगत होत चाललेलं आहे, आपण त्याच्या बरोबर अपग्रेड होणं गरजेचं आहे पण जोशी तसे होत नाहीत,त्यांची बायको हि घरगुती पदार्थ बनवून केटरिंग चा व्यवसाय करीत असते पण ती कालानुरूप स्वतःमध्ये आणि वापरात येणाऱ्या उपकरणात बदल करते, तिचा मुलगा हा सुद्धा कामधंदा करीत असताना जगाप्रमाणे कामात बदल करीत असतो, जोशी आजी ह्यांचे डोळ्याचे ऑपरेशन झालेलं असून त्यांना कमी दिसत असले तरी त्या टीव्ही बघण्यापेक्षा ऐकणे पसंत करतात.
लेथ जोशी, सौ जोशी, त्यांचा मुलगा जोशी, आणि जोशी आजी ह्या व्यक्तिरेखा आजच्या काळाची प्रतीके आहेत. लेथ जोशी ची मध्यवर्ती भूमिका चित्तरंजन गिरी यांनी साकारलेली असून त्या भूमिकेच्या देहबोली बरोबरच जीवनात येणाऱ्या सुखदुःखाच्या प्रसंगाच्या वेळी त्यांचे डोळे खूप काही सांगून जातात, सौ जोशी ची भूमिका अश्विनी गिरी यांनी कुटुंबामधील परिस्थितीत होणाऱ्या बदलाच्या भावना छान व्यक्त केल्या आहेत. ओम भुतकर यांनी जोशींच्या मुलाची भूमिका मनापासून केली आहे. जोशी आजी ची भूमिका सेवा चौहान यांनी साकारलेली असून जुन्या-नव्या पिढीचा संघर्ष उत्तम व्यक्त केला आहे. दिगदर्शक मंगेश जोशी यांनी ह्या चार व्यक्तिरेखा एकत्र बांधून एक वास्तववादी अंतर्मुख करणारी कथा सादर केली असून ती उत्तम परिणाम साधून जाते.
मानवी मनाचे कंगोरे उलगडणारा लेथ जोशी आहे.
दिनानाथ घारपुरे
Leave a Reply