‘फार्ससम्राट’ बबन प्रभू यांच्या रंगभूमीवर नव्याने आलेल्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या नाटकाने अल्पावधीतच २५ प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. गेली चार दशके रंगभूमीवर हे नाटक गाजत आहे. १९७३ मध्ये प्रथम हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते. नव्या संचात हे नाटक रंगभूमीवर सादर होत असून, विनोदाचा बादशहा संतोष पवार याने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
या नाटकाच्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सचिन पिळगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संवाद साधताना त्यांनी या नाटकाच्या नव्या टीमचे कौतुक केले. माझ्या अतिशय आवडत्या नाटकांत ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ हे नाटक वरच्या स्थानावर आहे. जेव्हा आत्माराम भेंडे हे नाटक करायचे; तेव्हा शिवाजी मंदिरात मी हे नाटक ३८ वेळा पाहिले आहे. आज नव्या संचातला या नाटकाचा प्रयोग पाहण्याचा मला योग आला. हा प्रयोग या मंडळींनी यशस्वी करून दाखवला आहे, असे गौरवोद्गार सचिन पिळगावकर यांनी यावेळी काढले.
या प्रयोगाला सचिन पिळगावकर हे त्यांच्या मातोश्री व भगिनीसह उपस्थित होते. नाटकाच्या टीमविषयी बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले, संतोष पवार हा माझ्या खूप जवळचा आहे. तो जेव्हा काही नवीन करतो; तेव्हा ते मी पाहण्याचा आवर्जून प्रयत्न करत असतो. विनय येडेकर हा माझा जुना मित्र आहे. आम्ही बऱ्याच चित्रपटांतून एकत्र काम केले आहे. नयना आपटे यांचा तर मी खूप चाहता आहे. त्यांच्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच ठरेल. सचिन पिळगावकर पुढे म्हणाले, या नाटकाच्या ५० व्या प्रयोगालाही मी आवर्जून येणार आहे आणि त्यावेळी माझ्यासोबत सुप्रिया व श्रिया या दोघी असतील, असा शब्द या नाटकाच्या टीमला दिला.
– राज चिंचणकर
Leave a Reply