मनोरंजन क्षेत्रात कलाकारांची एकमेकांशी मैत्री असते. ही मैत्री नव्याने झालेली असू शकते किंवा जुनीही असू शकते. पण अभिनेते अशोक शिंदे व अभिनेत्री निवेदिता सराफ यांची अशीच सच्ची मैत्री तब्बल ३० वर्षांपासून असल्याचे उघड झाले आहे. यासाठी निमित्त ठरले आहे, ते लवकरच पडद्यावर येणाऱ्या ‘दोस्तीगिरी’ या चित्रपटाचे! या चित्रपटाच्या संगीत अनावरण प्रसंगी या दोघांमधली ही ‘दोस्तीगिरी’ अवचित उलगडली.
अभिनेता संकेत पाठक हा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. ‘दुहेरी’ मालिकेत त्याच्या आईची भूमिका निवेदिता सराफ यांची; तर ‘छत्रीवाली’ या मालिकेत त्याच्या वडिलांची भूमिका अभिनेते अशोक शिंदे करत आहेत. संकेतचा हा पहिलाच चित्रपट आहे आणि या योग साधून त्याने निवेदिता सराफ व अशोक शिंदे यांना या सोहळ्यासाठी खास निमंत्रित केले होते.
संतोष पानकर निर्मित आणि विजय शिंदे दिग्दर्शित ‘दोस्तीगिरी’ या चित्रपटाचे लेखन मनोज वाडकर यांनी केले आहे. रोहन-रोहन यांचे संगीत असलेल्या या चित्रपटात संकेत पाठक, अक्षय वाघमारे, विजय गिते, पूजा मळेकर, पूजा जयस्वाल हे युवा कलाकार भूमिका रंगवत आहेत. २४ ऑगस्टपासून या कलाकारांची ही ‘दोस्तीगिरी’ रसिकांना चित्रपटगृहांत अनुभवता येणार आहे.
– राज चिंचणकर
Leave a Reply