ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध भारतातील १८५७ च्या रणसंग्रामात असामान्य पराक्रम करणारी वीरांगना म्हणून झाशीची राणी लक्ष्मीबाईचे नाव विख्यात आहे. ‘झाशी ची राणी’ अशी ओळख असणाऱ्या या रणरागिणीच्या जीवनचरित्रावर ‘स्वोर्डस अँँड सेपटर्स’ नावाचा आंतरराष्ट्रीय सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरल्या गेलेल्या या ज्वलंत घटनेची दखल या सिनेमाद्वारे जागतिक पातळीवर घेतली जाणार आहे.
भारतीय कलाशास्त्रज्ञ, प्रोफेसर, आणि भरतनाट्यम विशारद असलेल्या स्वाती भिसे यांनी या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रसिद्ध इंडो-अमेरिकन अभिनेत्री देविका भिसेने यात राणी लक्ष्मीबाईची प्रमुख भूमिका साकारली असून, या आंतरराष्ट्रीय चित्रपटात अजिंक्य देव, यतीन कार्येकर, नागेश भोसले, सिया पाटील आणि पल्लवी पाटील या मराठी चेहऱ्यांचा वावरदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. राणी लक्ष्मीबाईची यशोगाथा जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात लवकरच पोहोचवणाऱ्या या सिनेमाचा नुकताच तडफदार पोस्टर लाँँच करण्यात आला.
‘स्वोर्डस अँँड सेपटर्स’ हा हॉलीवूड सिनेमा जरी असला, तरी या सिनेमाचा विषय भारतातल्या ऐतिहासिक घटनेवर आधारित असल्यामुळे, या सिनेमाच्या पोस्टरवर भारतीय संस्कृतीचा मुलामा चढलेला आपल्याला दिसून येतो. १८५७ च्या उठावाची क्रांतीज्योत पेटवणा-या राणी लक्ष्मीबाईचे तेजस्वी रूप यात आपल्याला दिसून येते.
हा सिनेमा इंग्रजी भाषेमध्ये जरी असला तरी, यात थोड्याफार प्रमाणात मराठी आणि हिंदी भाषेचादेखील वापर करण्यात आला आहे.
Leave a Reply