चांगुलपणा नेहमीच वाईटावर मात करतो, हे अगदी सरळ तत्व आहे. आपण वाईट विचार करून कोणा व्यक्तीच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेत असतो. माझे नुकसान झाले तर ते नुकसान भरून काढण्यासाठी मी कोणा दुसऱ्या व्यक्तीला फसवणार, अशी राक्षसी सुडबुद्धी काही अंशी मनात येते. पण अशा सुडबुद्धी असणाऱ्या व्यक्तीला चांगुलपणाची साथ लाभली तर काय होते त्याचा सुंदर कोलाज या सिनेमातून पाहायला मिळतो.
ही कथा आहे दोन मित्रांची. बाळू (साहिल जाधव) आणि डिस्को (संग्राम देसाई). बाळू मूळचा साताऱ्याच्या. गावाकडे स्वतः चे ऊसाचे गुऱ्हाळ असावे हेच स्वप्न बाळगून तो मुंबईतील एका हॉटेलात वेटरचे काम करतो, तर डिस्को मोबाईल रिपेअर चे काम करतो. बाळू मुळताच साधा. मेहनातीने पैसे कमवायचे आणि आपले स्वप्न पूर्ण करायचे. गावात त्याला दुकान घेण्यासाठी पैसे कमी पडतात. पैसे कमवण्याच्या नादात तो त्याच्याकडे असलेले पैसेही एका फ्रॉड कंपनीत गमावतो. आपल्याला फसवलेय पण तो त्यांच्यासाठी बिजनेस आहे असे डिस्को त्याला सांगतो. आणि आता आपण ही असेच लोकांना फसवायचे आणि पैसे गोळा करायचे ही आयडिया बाळूला देतो. आणि ही आयडिया असते लोकांना लॉटरी लागल्याचे खोटे मेसेज पाठवण्याची. याच मेसेजमधून प्रसन्न ठोंबरे ( स्वानंद किरकिरे) या दोघांना भेटतो आणि तिथून कथेला एक वेगळेच वळण मिळते. प्रसन्नला पाहिल्यावर त्याला फसवण्याची हिम्मत बाळू करत नाही. सरळ, भोळाभाबडा स्वभाव आणि
थोडासा गतिमंद असणारा हा प्रसन्न ही काहीसा वाईट परिस्थितीतून आलेला आणि गेलेले सगळे वैभव आपण लॉटरीतून परत आणायचे असा विचार करणारा. प्रसन्नची भेट जेव्हा बाळू आणि डिस्कोशी होते, त्यावेळेस खरी गोष्ट सुरू होते.
प्रसन्न चुंबकसारखा बाळूला चिकटल्यासारखा असतो आणि एक वेगळीच धमाल पाहायला मिळते. शेवटी चांगुलपणा खरच त्यांच्या स्वार्थी बुद्धीला मारक ठरतो का? हे पडद्यावर पाहण्यात मज्जा आहे.

स्वानंद किरकिरे यांनी प्रसन्न अचूक टिपलाय. त्यांच्या देहबोलीतुन भूमिकेतील चांगुलपणा ठसठशीत जाणवला. साहिल जाधव आणि संग्राम देसाई यांचा हा पहिलाच सिनेमा. पहिल्या सिनेमात दोघेही भाव खाऊन गेलेत. परिस्थितीशी साजेसे संवाद, मानवी स्वभावदर्शन , उत्तम अभिनय अशा गोष्टींनी परिपूर्ण अशी भावनिक कलाकृती.
सारिका कामतेकर-नाईक
Far Chan lihilay
LikeLike