
मराठी नाटक, चित्रपट व मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची विशेष छाप उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार आता वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रमोद पवार यांनी आतापर्यंत काही नाटकांचे दिग्दर्शन केले असले, तरी चित्रपट दिग्दर्शनापासून मात्र ते दूर होते. ‘ट्रकभर स्वप्नं’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने मात्र त्यांच्या कारकिर्दीतली ही कसर आता भरून निघणार आहे. दिग्दर्शनाचे त्यांचे हे स्वप्न आता पूर्णत्वास जात असून, त्यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलावहिला चित्रपट २४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात त्यांच्या दिग्दर्शनाखाली मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश ऋषी, मनोज जोशी, स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगारे आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाविषयी बोलताना प्रमोद पवार म्हणतात, आपण स्वप्ने पाहतो; परंतु ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरतातच असे नाही. मात्र जगण्याचे प्रतिबिंब दाखवणाऱ्या एका कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रवास आम्ही उलगडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.
Leave a Reply