प्रत्येकाच्या मनांत घराचे स्वप्न असते, लहान घरातून मोठया घरात जावे किंवा आपल्या घरावर आणखी एक माळा असावा असे वाटत असते, अश्याच ह्या मध्यवर्ती कल्पनेवर
प्रत्येकाच्या मनांत घराचे स्वप्न असते, लहान घरातून मोठया घरात जावे किंवा आपल्या घरावर आणखी एक माळा असावा असे वाटत असते, अश्याच ह्या मध्यवर्ती कल्पनेवर आधारीत ” ट्रकभर स्वप्न ” भाष्य करतो.
जागेची समस्या आजही संपलेली नाही. प्रत्येकाला घर हवे आहे. कोकणात राहणारा राजा नावाचा माणूस आपली बायको राणी आणि आपल्या दोन मुलांच्या बरोबर मुंबईला येतो. मुंबापुरीत हजारो स्वप्ने आहेत. अनेक मोह–मायाने नटलेली हि नगरी आहे. गावाकडील माणूस इथे येतो त्याने मनात उराशी खूप स्वप्ने जपलेली असतात त्याची पूर्तता करताना त्याला मात्र अनेक संकटाना सामोरे जावे लागते. राजा मुंबईला आल्यावर टॅक्सी चालवतो. स्वतःच्या मेहनतीने स्वतःची टॅक्सी घेतो. आपल्या घरावर एक पोटमाळा बांधावा असे त्याला वाटत असते. हा माणूस साधासरळ मार्गी असून प्रत्येकाला मदत करीत असतो. त्याची बायको राणी घर–संसाराला मदत करण्यासाठी लोकांच्या कडे धुणीभांडी करीत असते. तिची मुलगी काजल हिला नृत्याची आवड असते तिला नृत्यांगना व्हायचे असते. सनी नावाचा मुलगा शाळेत शिकत असतो राजाला त्याला बॅरिस्टर बनवायचे असते.अशी प्रत्येकाची वेगवेगळी स्वप्ने आहेत.
राजा–राणीचे कुटुंब हे मुंबईत एका झोपडपट्टीत राहत असते, त्या झोपड्पट्टीवर आरके नावाच्या दादाची हुकमत असते. लोकांच्या गरिबीचा आणि त्यांच्या अज्ञानाचा फायदा तो घेत असतो. त्याची नजर चांगली नसते. गैरमार्गाने तो पैसे कमवत असतो. झोपडपट्टीत राहणारे लोक वेगवेगळ्या पद्धतीचे जीवन जगत असतात. प्रत्येकाची व्यथा वेगळी आहे. असे सारे समस्या घेऊन आयुष्य पुढे–पुढे ढकलत असतात. राजाला आपले घर मोठे असावे – वरती एक पोटमाळा बांधावा अशी त्याची इच्छा असते, त्यासाठी तो आरके ची मदत घेतो. आरके दादानी आपली माणसे वरपर्यंत पेरून ठेवलेली असतात, महानगरपालिके मधील कर्मचारी सुद्धा त्याने आपल्या ताब्यात ठेवलेले असतात. त्याचे गैरप्रकार कसे दडपले जातात ह्यावर हा सिनेमा भाष्य करतो.
मकरंद देशपांडे यांनी राजाची भूमिका केली असून राजाचा विक्षिप्तपणा त्याने छान व्यक्त केला आहे, घराच्या / पोटमाळ्याच्या स्वप्नाने तो पछाडलेला आहे, त्यासाठी तो आरके दादाची मदत घेतो. राजाच्या स्वप्नाला राणी आपल्या परीने मदत करीत असते, राजाच्या गावाकडील घरची माणसे राजाचे मुंबईत चांगले चालेले आहे हे पाहून त्याचा हेवा करतात.काजल नृत्याच्या कामासाठी राणीची मैत्रीण ज्योती ची मदत घेते. राणीची भूमिका क्रांती रेडकर हिने मनापासून केली आहे. सुखदुःखाचे प्रसंग तिने छान व्यक्त केले आहेत. या सर्वाना अदिती पोहनकर, स्मिता तांबे, मनोज जोशी, साहिल गिलबिले, विजय कदम, आशा शेलार, सुरेश भागवत यांनी उत्तम साथ दिली आहे. मुकेश ऋषी यांनी आरके चा बेरकीपणा उत्तम दाखवला आहे. प्रमोद पवार यांचे दिगदर्शन असून त्यांची कथा मनाला भावणारी आहे. पण ती मांडण्यात काहीशी पटकथे मध्ये फसलेली जाणवते. गीत–संगीत छान आहे, छायाचित्रण चांगले आहे. संकलन ठीक, कलाकारांची कामे छान टीमवर्क उत्तम आहे तरीसुद्धा सिनेमा काही ठिकाणी रेंगाळतो.
शेवटी राजाचे घराचे – पोटमाळ्याचे स्वप्न पूर्ण होते कि नाही ? राजाच्या मुलाला चांगले शिक्षण मिळते का ? मुलीची नृत्याची आवड पूर्ण होते का ? कर्तव्य कठोर अधिकारी ह्या गरीब जनतेशी कसे वागतात ? राजाने गुंतवलेले पैसे त्याला परत मिळतात कि नाही ?अश्या अनेक भावनिक प्रश्नावर भाष्य करीत सिनेमा उत्तरे देतो. शेवटी हे स्वप्न पाहायचे कि नाही हे प्रेक्षकच ठरवतील.
दीनानाथ घारपुरे
Leave a Reply