मराठी सिनेमांनी जगभरातील फिल्ममेकर्सना भुरळ घातली आहे. अॅड. समृद्धी पोरे यांनी २०११ मधे आपला पहिला चित्रपट बनवला ‘मला आई व्हायचंय’. या चित्रपटाचा विषय होता ‘सरोगेशन’ म्हणजेच गर्भ भाडयाने देणे /घेणे. ज्यावेळी या विषयावर जास्त बोललंही जात नव्हतं तेव्हा या विषयावर त्यांनी ह्या चित्रपटाची कहाणी लिहिली, दिग्दर्शक म्हणून काम पाहिले व अशा विषयावर कुणीच निर्माता मिळत नाही बघून स्वत:च निर्मिती क्षेत्रातही पहिले पाऊल टाकले, आणि पदार्पणातच त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार,राज्य पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुध्दा पटकावले. आज मात्र तब्बल आठ वर्षानंतर याच चित्रपटाचा हिंदीत रिमेक होत आहे.
पूर्वी गाजलेल्या हिंदी सिनेमाची कॉपी बऱ्याचदा मराठीत केली जात असे पण मराठीचा हिंदीत रिमेक होऊन जास्तं दर्शकांपर्यंत चित्रपट पोहचणे ही खरच अभिमानाची गोष्ट आहे. एका गहन विषयावर आधारित असलेला ‘मला आई व्हायचंय’ हा सिनेमा निर्माता दिनेश विजान यांनी विमानात पाहिला आणि इतका सुंदर चित्रपट मराठी शिवाय इतर लोकांपर्यंत पोचला कसा नाही याबद्दल खंत वाटली. त्यांना ही कहाणी ऑस्कर विजेता गास डेविसच्या “लायन” या चित्रपटासारखी वाटली.
काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बहुचर्चित ‘स्त्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अमर कौशिक आणि निर्माता दिनेश विजान यांनी ‘मला आई व्हायचंय’ या मराठी सिनेमाचा हिंदी रिमेक बनवण्याची इच्छा जाहीर केली. त्यानुसार अॅड. समृद्धी पोरे यांनी त्यांना कायदेशीर हिंदी रिमेक चे राईट दिलेत. यामधे हिंदीतली आणि हॉलीवूड मधल्या गाजलेल्या नायिका काम करणार आहेत. कहाणीचे लेखन स्वतः समृद्धी पोरे करणार आहेत.
Leave a Reply