आपण माणसाच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून त्याच्या कामाचा अंदाज बांधतो, व्यक्तीची शारीरिक ठेवण हि वेगवेगळी असते, कोणी बारीक, कोणी गलेलठ्ठ, तर कोणी वाजवीपेक्षा अधिक जाडजूड म्हणजे अगदी अगडबंब शरीराची ठेवण असू शकते, मग आपण त्या व्यक्तीच्या अंतरंगात डोकावून पहायला लागतो, अश्याच एका नाजुका नावाच्या अगडबंब स्त्री ची कथा ‘माझा अगडबम’ ह्या सिनेमात मांडली आहे.
अगडबंब शरीराची नाजुका आणि सर्व सामान्य प्रकृतीचा रायबा या दोघांची हि कथा. त्या दोघांचा संसार हा दिसायला विसंगत असला तरी दोघांचे एकमेकावर प्रेम आहे. त्यांना मुल होत नसते हि खंत दोघांना आहे, नाजुकाचे वडील किशन हे कुस्ती खेळण्यात पटाईत, तर रायबा ची आई पारो हि घरसंसार करणारी स्त्री, रायबाला वडील नाहीत त्यामुळे पारो हि आपल्या वडिलांच्या फोटो बरोबर बोलत असते. रायबाला कुस्तीचा भयंकर तिटकारा, एक दिवस रेसलिंग च्या खेळामध्ये पाहुणे म्हणून बोलावले असतांना तेथे परदेशी खेळाडूंच्या बरोबर भांडण होते आणि त्यातील एक खेळाडू त्यांना आव्हान देतो कि तुमच्या आखाड्यातील एक सुद्धा खेळाडू मला हरवू शकणार नाही हि गोष्ट नाजुकाला समजते आणि अगडबंब नाजुका माझा अगडबंब कशी बनते ? आणि पुढे काय काय घटना घडतात ते सिनेमात पहायला मिळेल.
नाजुका ची भूमिका तृप्ती भोईर यांनी केली असून आपले अगडबंब शरीर सांभाळत तिने अनेक कसरती केल्या आहेत. ह्या व्यक्तिरेखेच्या भावना सुरेख दाखवल्या आहेत. रायाबाची भूमिका सुबोध भावे यांनी मनापासून केली आहे. उषा नाडकर्णी हिने रायाबाची आई आणि जयवंत वाडकर यांनी नाजुकाचे वडील या भूमिका चोखपणे केल्या आहेत. ह्या मध्ये रेसलिंग / कुस्ती ह्या खेळावर अधिक भर दिला आहे. नाजुका त्यासाठी “ सुमो पैलवान “ ह्यांच्या कडून शिक्षण घेते आणि मैदानात उतरते, शेवटी आपल्या वडिलांचा झालेल्या अपमानाचा बदला ती घेते का ? रायबाला नाजुका बद्दल काय वाटते ? रायाबाची आई नाजुकाला कशी सांभाळते ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमात मिळतील. चित्रपट करमणूक करताना पटकथेमध्ये फसलेला जाणवतो. अरुण वर्मा यांचे छायाचित्रण ठीक, सिनेमाचे संगीत हे टी. सतीश चक्रवर्ती यांनी सुमधुर दिलेले असून ती एक जमेची बाजू आहे.
नाजुका अगडबंब बाई असली तरी घर संसार सांभाळताना ती अशी एक गोष्ट करते कि तिने आयुष्यात ती गोष्ट केलेली नाही. पण मनामध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर यशाकडे आपण वाटचाल करू शकू असा संदेश नाजुका कळत न कळत देऊन जाते.
एकंदरीत माझा अगडबम ला किती प्रतिसाद मिळतो हे प्रेक्षकच ठरवतील.
दीनानाथ घारपुरे
Leave a Reply