कलाकार आपल्या कलेवर रंगभूमीवर प्रेम करणारा, आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत… त्याला वैयक्तिक आयुष्यात किती चढ-उतरांना सामोरे जावे लागते ते फक्त नियतीच जाणू शकते. कलाकाराला मन असते. भावना असतात. वागण्यात बेदरकार, बेधडकपणा असला तरी अभिनयातून भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखा पेश करीत असताना त्यामध्ये तो एकरूप होतो आणि त्याचे नाव सर्वतोमुखी होते. अशाच एका मनस्वी – संवेदनशील – हरहुन्नरी कलाकाराच्या जीवनपटाचा आलेख ‘ आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ ह्या चित्रपटात मांडला आहे.
डॉ काशिनाथ घाणेकर एक उत्तम दंतवैद्य. पण रंगभूमीचे त्यांना पहिल्या पासून आकर्षण. सुरवातीच्या काळात नाटकातून लहान सहान भूमिका करीत आपली आवड जोपासली, पण रंगभूमीसाठी काहीतरी प्रभावीपणे करावे हि त्यांची मनोकामना, स्वभाव बेधडक, देधडक, तरीही तितकाच भावनाप्रधान असलेला हा कलावंत. नवीन नाटकात कामे मिळावी म्हणून त्यांनी चाचणी परीक्षा दिल्या आणि एक दिवस त्यांच्या बेदरकार स्वभावामुळे त्यांना ‘ रायगडला जेंव्हा जाग येते’ ह्या नाटकात ‘संभाजी’ ची भूमिका करायला मिळाली आणि त्यांनी त्या भूमिकेचे ‘सोने’ केले. त्यांनी साकारलेला संभाजी हा प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला. त्यांची वाटचाल सुरु झाली. वेगवेगळ्या कलाकरांच्या बरोबर त्यांचे उठणे-बसणे सुरु झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. रायगडला जेंव्हा जाग येते मधील संभाजी, अश्रूंची झाली फुले मधील लाल्या, गारंबीचा बापू मधील बापू, इथे ओशाळला मृत्यू मधील संभाजी, आनंदी गोपाळ मधील गोपाळ अशा त्यांच्या भूमिकेचा रसिकांनी आस्वाद घेतला. चित्रपट मराठा तितुका मेळवावा, पाठलाग, हा खेळ सावल्यांचा, मधील भूमिका त्यांनी गाजवल्या. पण कलाकारांच्या जीवनात उतार चढाव येतातच तसे त्यांच्या काळात त्यांना ते पहायला लागले.
डॉ काशिनाथ घाणेकर यांच्या भोवतीच सारे कथानक फिरते आहे. डॉ काशिनाथ घाणेकर यांचे डॉ. इरावती यांच्या बरोबर लग्न झालेलं होतेच त्याचवेळी त्यांच्या जीवनात कांचन चा { सुलोचना दीदी यांची मुलगी } ह्यांचा प्रवेश झाला आणि त्यांचे प्रेमाचे धागे जुळायला सुरवात झाली. पुढे त्यांचे लग्न झाले.
मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ ह्या सिनेमातून दाखवला आहे. काशिनाथ घाणेकर हे मनस्वी, संवेदनशील होते. त्यांच्या जीवनात अनेक सुख दुःखाचे क्षण आले आपल्या बरोबरीच्या कलाकारांच्या बरोबर वादविवाद सुद्धा झाले. डॉ.श्रीराम लागू यांची नाटके त्यावेळी रंगभूमीवर येत होते लोकप्रियतेचे पारडे कधी डॉ. काशिनाथ घाणेकर तर कधी डॉ. श्रीराम लागू ह्यांच्या कडे झुकत होते. हे सगळे सिनेमात अनुभवायला मिळेल,
डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा सुख दुःखाचा प्रवास प्रामाणिकपणे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी मांडला आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर ह्यांच्या स्वभावातील सारे पैलू त्यांनी अभ्यासपूर्ण रीतीने सादर केले आहेत.
सुबोध भावे यांनी डॉ काशिनाथ घाणेकर हि व्यातीरेखा प्रभावीपणे रंगवली आहे. घाणेकर यांचा बेधुंद, बेलगाम, कुणाची पर्वा न करणारा, स्वतःच्या सुखद वलयात जगणारा, स्वतःवर प्रेम करणारा, हरहुन्नरी, अष्टपैलू, आणि जी गोष्ठ आवडते त्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणारा असा विलक्षण कलाकार त्यांनी सादर केला आहे. सुमित राघवन यांनी डॉ. श्रीराम लागू ची भूमिका तितकीच ताकदीने साकारली आहे. सोनाली कुलकर्णी यांनी सुलोचना दीदी, मोहन जोशी यांनी भालजी पेंढारकर, आनंद इंगळे यांनी वसंत कानेटकर, प्रसाद ओक यांनी प्रभाकरपंत पणशीकर, नंदिता धुरी यांनी डॉ इरावती घाणेकर, वैदेही परशुरामी यांनी मिसेस कांचन घाणेकर हि भूमिका साकारली असून ह्या सर्वांच्या भूमिका लक्षांत राहतात, चित्रपटाचे लेखन – दिग्दर्शन अभिजित शिरीष देशपांडे यांनी बंदिस्तपणे केले आहे, छायाचित्रण छान आहे, संगीत उत्तम असून रंगभूषा विक्रम गायकवाड आणि वेशभूषा नचिकेत बर्वे यांची कामगिरी खूप मोलाची आहे. भूमिकेचा गेटअप आणि त्याला साजेशी वेशभूषा ही लक्षांत राहते, सर्वच कलाकारांचे एक उत्तम टीमवर्क अनुभवायला मिळते.
एक समाधान देणारा १९६० – १९८६ च्या काळात घेऊन जाणारा हा सुरेख सिनेमा आहे.
दीनानाथ घारपुरे
Leave a Reply