सर्वसामान्य व्यक्तींमध्ये दडलेल्या कर्तृत्वाची दखल घेण्याच्या हेतूने ‘अकस’ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेता अंशुमन विचारे यांच्या ऍक्टिंग अकॅडमीतर्फे हे पुरस्कार दिले जाणार आहेत. असामान्य कर्तृत्वाला सलाम (अकस) असे यामागचे सूत्र आहे. समाजात विविध प्रकारे कर्तृत्व बजावणाऱ्या सामान्य व्यक्तींचा या पुरस्कारांच्या माध्यमातून सन्मान करण्यात येणार आहे.

समाजात माणूसकी, सद्भावना व चांगुलपणा यावरचा विश्वास वृद्धिंगत व्हावा आणि सामाजिक बांधिलकी जोपासली जावी, असा उद्देश या पुरस्कारांमागे आहे. रोख रक्कम ११ हजार, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. या पुरस्कारांचे हे पहिले वर्ष असून, यंदा एकूण ६ पुरस्कार दिले जाणार आहेत. समाजातील सामान्य व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येणार असून, त्यासाठी आयोजकांनी समाजाच्या सर्व स्तरांतून निवेदने मागविली आहेत.
आयोजकांना प्राप्त होणाऱ्या निवेदनांतून निवड समिती योग्य त्या व्यक्तींची निवड करणार आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्त्या व व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार या ज्युरी म्हणून काम पाहणार आहेत. स्वतः अंशुमन विचारे यांच्यासह राजेंद्र पवार, दीपक गोडबोले, संतोषी पवार अशा कार्यकर्त्यांचे बळ या पुरस्कार संकल्पनेमागे आहे. पुरस्कार वितरण सोहळा फेब्रुवारी २०१९ मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या पुरस्कारांसाठी निवेदने स्वीकारण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी २०१९ आहे. निवेदने लेखी अर्जाद्वारे; तसेच ‘इमेल’द्वारे स्वीकारण्यात येणार आहेत. निवेदनाच्या प्रवेशिका अंशुमन विचारे ऍक्टिंग अकॅडमीच्या कार्यालयातही उपलब्ध आहेत. निवेदने पत्राद्वारे पाठवायची असल्यास खालील पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पत्ता : अंशुमन विचारे ऍक्टिंग अकॅडमी, पुष्पकधाम सोसायटी, पंचमुखी मारुती मंदिराजवळ, बेतुरकर पाडा, कल्याण (पश्चिम) – ४२१३०१.
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३६९५१००४६
Leave a Reply