– राज चिंचणकर
ज्येष्ठ नाटककार विश्राम बेडेकर यांचे ‘वाजे पाऊल आपुले’ हे नाटक सत्तरच्या दशकात रंगभूमीवर आले आणि ते थेट रसिकांच्या मनात जाऊन रुतले. पण नंतरच्या काळात हे नाटक तसे विस्मरणात गेले होते. मात्र, १९६७ मध्ये रंगभूमीवर गाजलेले हे नाटक, तब्बल अर्धशतकानंतर मुंबई मराठी साहित्य संघाची नाट्यशाखा पुन्हा रंगभूमीवर साकारत आहे.

ज्येष्ठ रंगकर्मी व अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जयंत सावरकर यांनी या नाटकाची धुरा आता हाती घेतली आहे. १९६७ मध्ये विश्राम बेडेकर व दामू केंकरे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने या नाटकाची निर्मिती झाली. मधल्या काळात काहीजणांनी हे नाटक करण्याचा प्रयत्न केला; परंतु तो यशस्वी झाला नाही. विश्राम बेडेकर यांच्या हाताखाली मी काम केले आहे आणि त्यामुळे हे नाटक करताना मला खूप उपयोग झाला, असे मत जयंत सावरकर याविषयी बोलताना मांडतात.
या नाटकासोबतच विश्राम बेडेकर यांच्या ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकाच्या अभिवाचनाचा संकल्पही मुंबई मराठी साहित्य संघाने केला आहे. युवा रंगकर्मी कौस्तुभ सावरकर याच्या दिग्दर्शनाखाली व कर्जत येथील ‘नाट्यरंग’ या संस्थेच्या सहकार्याने या अभिवाचनाचे प्रयोग होणार आहेत.
Leave a Reply