– राज चिंचणकर
मराठी रंगभूमीवर विविध विषयांचे प्रतिबिंब पडत असतानाच, रंगभूमीच्या गालावर आता चक्क गोड ‘खळी’ उमटणार आहे. ‘नाट्यमंदार’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ या दोन संस्था ‘खळी’ हे नवीन नाटक घेऊन रंगभूमीवर येत आहेत. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन शिरीष लाटकर यांनी केले आहे. संदेश जाधव, पल्लवी सुभाष व नेहा अष्टपुत्रे हे कलाकार या नाटकात भूमिका रंगवत आहेत. १५ डिसेंबर रोजी या नाटकाचा शुभारंभ मुंबईच्या दीनानाथ नाट्यगृहात होणार आहे.

‘खळी’ या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक शिरीष लाटकर म्हणतात, आतापर्यंत मी खूप लेखन केले आहे; पण ‘खळी’ या नाटकाच्या निमित्ताने मी प्रथमच एखाद्या नाटकाचे दिग्दर्शन करत आहे. प्रत्येकाच्या गालावर खळी उमटेल असा हा विषय आहे. वयाच्या पस्तिसाव्या वर्षानंतर एकाच्या आयुष्यात प्रेम ही भावना निर्माण होते आणि त्यावर हे नाटक आधारित आहे. वेगवेगळ्या स्वभावाची माणसे कशी एकत्र येऊ शकतात हे या नाटकात दिसते. एक गोड प्रेमकहाणी यात मांडली आहे.
बऱ्याच वर्षांनंतर नाटकात येणारी पल्लवी सुभाष म्हणते, या नाटकाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी स्क्रिप्टच्या प्रेमातच पडले. शिरीष लाटकर यांचे दिग्दर्शक म्हणून हे पहिलेच नाटक आहे आणि त्याचा मी भाग आहे हे मला सुखावणारे आहे. या नाटकात मी ‘उपासना’ हे पात्र करत आहे. ही उपासना थोडीफार माझ्यासारखीच आहे. आम्ही या नाटकासाठी खूप मेहनत घेत आहोत आणि सर्वांना हे नाटक आवडेल याची आम्हाला खात्री आहे.
आतापर्यंत महाराष्ट्राने मला इन्स्पेक्टरच्या भूमिकेत अनेकवेळा पाहिले आहे. त्यामुळे जेव्हा हे नाटक माझ्याकडे आले, तेव्हा मला खरंच आनंद झाला. कारण यातली माझी भूमिका खूप वेगळी आहे. अशाप्रकारचे नाटक मी प्रथमच करत आहे. हे लेखन मला खूप आवडले. यातले प्रत्येक पात्र आपापल्या कोशात अडकले आहे. यातले माझे पात्र मात्र सकारात्मक आहे, असे संदेश जाधव त्यांच्या भूमिकेविषयी सांगतात.
‘खळी’ हे माझे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. जेव्हा शिरीष लाटकर यांनी मला या नाटकासाठी मला विचारले तेव्हा मी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. एका खूप छान नाटकात काम करण्याची मला संधी मिळाली आहे. जे साधे असते ते खास असते, अशाप्रकारची भावना या नाटकातून समोर येते. या नाटकात मी ‘चिंगी’ हे पात्र रंगवत आहे. हे नाटक अजून आम्हाला खुलवता येईल असे वाटते, अशी भूमिका नेहा अष्टपुत्रे मांडते.
या नाटकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकासाठी एक खास गाणे केले गेले आहे. बीना सातोस्कर यांनी हे गाणे लिहिले असून, केतन पटवर्धन यांने त्याला संगीत दिले आहे. स्वरांगी मराठे हिच्यासह केतन पटवर्धन याने हे गाणे गायले आहे. माझ्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता. नाटकासाठी केलेले हे माझे पहिलेच गाणे आहे. चांगले शब्द फार कमी वेळा गायला मिळतात, पण हे गाणे कंपोज करताना मला आल्हाददायक अनुभव येत गेला, असे केतन पटवर्धन म्हणतो.
मी खरं तर शास्त्रीय संगीत शिकत आहे आणि या नाटकाचे वेगळ्या प्रकारचे असे हे गाणे मी पहिल्यांदाच गायले आहे. शास्त्रीय संगीतापेक्षा काहीतरी वेगळे मला यात करायला मिळाले, असे स्वरांगी मराठे या गाण्याविषयी सांगते.
या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून, शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजना केली आहे. महेश नाईक यांचे पार्श्वसंगीत या नाटकाला आहे. मिताली शिंदे यांनी वेशभूषेची; तर दत्ता भाटकर यांनी रंगभूषेची जबाबदारी या नाटकासाठी सांभाळली आहे. ‘नाट्यमंदार’चे मंदार शिंदे; तसेच ‘विप्रा क्रिएशन्स’च्या संध्या रोठे व प्रांजली मते हे या नाटकाचे निर्माते आहेत.
Leave a Reply