छोट्या पडद्यावरील ‘मानसीचा चित्रकार तो’ या मालिकेतून अभिनेता ऋत्विक केंद्रे घराघरात पोहचला. त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत व नाट्यसृष्टीत आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच्या ‘मोहे पिया’ या हिंदी नाटकाला देशभरातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘ड्राय डे’ सिनेमालाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘ड्राय डे’ सिनेमानंतर ऋत्विकचा ‘सरगम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे यांचा मुलगा असलेल्या ऋत्विकला अभिनयाचे बाळकडू घरातून लाभले होते. लहानपणापासूनच अभिनयाचे संस्कार झाले असल्यामुळे ऋत्विक जाहिरात, नाटक, मालिका, सिनेमा या क्षेत्रांमध्ये अगदी बिनधास्त वावरताना आपल्याला पाहायला मिळतो आहे.

मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता ऋत्विक दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत अभिनय करण्यासाठी सज्ज झाला आहे.या सिनेमासाठी त्याने एक लूक टेस्ट दिल्याचे समजते आहे.या सिनेमासाठी तो खूप मेहनत घेत असून मार्शल आर्ट्सचेदेखील प्रशिक्षण घेतो आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी सध्या तो फिटनेसकडे खूप लक्ष देतो आहे. या चित्रपटाचे शीर्षक व कथानकाबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. एकंदरीत तो या सिनेमासाठी घेत असलेली मेहनत पाहता या चित्रपटातील त्याची भूमिका दमदार असणार आहे हे नक्की. सध्या तो वावरत असलेला लूक या सिनेमातील असल्याचे बोलले जात आहे. याबद्दल अधिकृतरित्या ऋत्विककडून जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.
Leave a Reply