दीनानाथ घारपुरे
जग हि एक रंगभूमी आहे आणि आपण सर्व वेगवेगळ्या भूमिका रंगवणारी पात्रे आहोत, आपले कर्म करताना धडपड करीत असतांना अनेकदा गडबड होते आपल्या चांगल्या वाईट क्षणात आपण आनंद शोधायला सुरवात करतो. आपण ठरवतो एक आणि समोर काही वेगळेच येते आणि मग धमाल गडबड सुरु होते.
एपिक गडबड ह्या नाटकात “ नाटक “ सादर केल आहे. आणि हि गंमत अनुभवण्या सारखी आहे. एका कुटुंबाची कथा नाटकात सुरु झालेली असते, मामाच्या भाचीचे लग्न ठरवायचे असते, मामाची इच्छा आहे कि आपली रूढी / परंपरा जपणारा असा नवरा तिला मिळावा, तो एक ऐतिहासिक पुरुष असावा, त्यासाठी मामा त्याची भाची आरती, बाब्या नावाचा घरगडी,आरतीची आई ज्योती, अशी हि पात्रे नवरा मुलगा कुमार पेशवा कधी येईल याची वाट पाहत असतात. पण त्याचवेळी तिथे विल्यम शेक्सपिअर हा अचानक येतो. आणि मग गडबड गुंतागुंत, विनोद अशी नाट्यमय प्रसंगाची बरसात व्हायला सुरवात होते. गंमत म्हणजे लग्नाळू मुलगी आरती हि शेक्सपिअरच्या प्रेमात पडते आणि अचानक गडबड अधिकच वाढते, आता हे सारे कथानक मी काही सांगणार नाही तुम्हीच नाट्यकृती चा अनुभव घ्या.
मामा, ज्योतीताई, आरती, कुमार पेशवा, बाब्या, विल्यम शेक्सपियर ह्या व्याकीतेखा भिन्न / भिन्न स्वभावाच्या आहेत. मामा हे स्वतःला प्रमुख पात्र समजत असतात पण लेखकाच्या मनात { नियतीच्या मनात } काही वेगळेच असते. आरती हि आजच्या तरुणीचे प्रतिनिधित्व करणारी आहे, बाब्या हा तरुण मुलगा नवीन योजना राबवणारा, त्याचा शोध घेणारा आहे, ज्योतीताई हि स्वभावाने प्रेमळ असून सर्वाना ती मदत करीत असते, कुमार पेशवा हा आजच्या तरुणाचे प्रतिनिधित्व करतो, विल्यम शेक्सपिअर हे जुन्या काळातले व्यक्तिमत्व नाटकाची उत्कंठा वाढवते.
नाटकात सर्वच व्यक्तिरेखा प्रमुख आहेत. त्यांच्या भोवती नाटक फिरते. सर्वांचे टीमवर्क उत्तम आहे. देशपांडे नावाच्या नाटककाराने आपली मनातील पात्रे रंगभूमीवर आणली असून त्या व्यक्तिरेखा कलाकारांनी छान रंगविल्या आहेत. नाटकातले नाटक हा एक धमाल प्रकार आहे. दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी हा प्रयोग अत्यंत बंदिस्तपणे आणि गतिमानता ठेवून सादर केला आहे. या नाटकात पेशवाई, शेक्सपिअर काळ आणि वर्तमान यांचे उत्तम चित्रण उभे केलेय. नाटकाचे नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीत हि नाटकाची जमेची बाजू आहे.
विल्यम शेक्सपिअर तेथे का येतो ? कुमार पेशवा आणि आरतीचे लग्न होते का ? बाकीची पात्रे लग्न होण्यासाठी कोणता खेळ खेळतात ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे नाटकात मिळतील.
नरेन चव्हाण सादर करीत आहेत आणि अभिजित साटम प्रस्तुत “एपिक गडबड “हि नाट्यकृती. निर्माते ऋजुता चव्हाण, मकरंद देशपांडे हे आहेत. लेखन / दिग्दर्शन मकरंद देशपांडे यांचे असून नेपथ्य टेडी मौर्या, प्रकाश योजना अमोल फडके यांचे आहे. रचिता अरोरा यांचे संगीत असून यामध्ये अंकित म्हात्रे, निनाद लिमये, आकांक्षा गाडे, माधुरी गवळी, भरत मोरे, अजय कांबळे या कलाकारांनी भूमिकेंना न्याय दिला आहे. अजय कांबळेची अभिनयऊर्जा अप्रतिम.
एक हटके अनुभूती देणारी हि नाट्यकृती आहे. अशा ह्या नवीन प्रयोगाचे स्वागत करायला हवे.