दीनानाथ घारपुरे –
‘नशीब…’ नशिबाने माणसाचे जीवन बदलून जाते. चांगले वागले कि त्याचे फळ चांगले मिळते. त्याचप्रमाणे अति लोभाचे सुद्धा फळ हे मिळतेच. हा मानवी स्वभाव आहे. अशाच मध्यवर्ती कल्पनेवर आधारित नशीबवान चित्रपट आहे. नशीबवान ची कथा उदय प्रकाश यांच्या ‘दिल्ली कि दिवार’ या कथेवर आधारित आहे.
सफाई कामगार बबन ह्याच्या कुटुंबाची कथा नशीबवान मध्ये मांडली आहे. एका महानगर पालिकेमध्ये नोकरी करीत असलेल्या बबनच्या आयुष्यात सफाई करताना एक विलक्षण घटना घडते आणि त्याचे नशीब बदलून जाते. आपली आर्थिक परिस्थिती बेताची असतानाच अशी घटना घडल्याने त्याचे जीवन हळू-हळू बदलायला लागते. लहान खोली मधून मोठया जागेत त्याचे स्थलांतर होते. सर्व सुख सोई तो उपभोगू लागतो आणि तो सर्वांच्या मनात घर करून रहातो. नशिबाने लॉटरी सारखा मिळालेला पैसा आणि कष्ट करून मिळवलेला पैसा ह्या मध्ये फरक आहे. माझा बॉस मला पैसे देतो असे तो सांगत असतानाच बबनला व्यसने लागतात. त्याची विचारसरणी बदलते आणि शेवटी त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. हे नेमके काय आहे ? ते सिनेमात पहायला मिळेल.
भाऊ कदमने बबन ची भूमिका मनापासून वेगवेगळे कंगोरे दाखवत केली आहे. त्याला साथ मिताली जगताप-वराडकर, नेहा जोशी यांनी छान दिलेली आहे. दिग्दर्शक अमोल वसंत गोळे यांनी चित्रपटाची कथा गतिमान ठेवली आहे. पैसा मिळायला लागला कि माणसाच्या स्वभावामध्ये परिस्थिती प्रमाणे बदल होतो, व्यक्तीने कष्टाने मिळवलेला पैसा आणि नशिबाने अचानक मिळालेला पैसा ह्या वर सिनेमा विचार मांडतो. एकंदरीत चित्रपट ठीक आहे.