– राज चिंचणकर
लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशा विविध प्रांतात मुशाफिरी केल्यानंतर श्रीरंग देशमुख थेट निर्माते बनले आहेत, हे तर सर्वांना माहीतच आहे. ‘एक निर्णय – स्वतःचा स्वतःसाठी’ या चित्रपटासाठी केवळ तेच नव्हे; तर त्यांचे अख्खे देशमुख कुटुंबीय कामाला लागले आहे. या चित्रपटातला ‘एक निर्णय’ कोण, कुणासाठी घेतो हे १८ जानेवारीला चित्रपट पडद्यावर आल्यावर समजणारच आहे. परंतु श्रीरंग देशमुख यांच्या व्यक्तिगत आयुष्याशीही ही संकल्पना रिलेट होते. आता हे नक्की काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनाच बोलते केले; तेव्हा त्यांनी त्यांच्या जीवनात घेतलेला ‘एक निर्णय’ उलगडून सांगितला.

श्रीरंग देशमुख यांची संपूर्ण फॅमिली ही ‘डॉक्टर्स फॅमिली’ आहे. साहजिकच, त्यांनी सुद्धा डॉक्टर व्हावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. श्रीरंगना डॉक्टर होण्याबाबत काही समस्या नव्हती; पण हॉस्पिटलचे वातावरण त्यांना अजिबात आवडायचे नाही. हे सर्व वडिलांना हे समजावून सांगण्यात त्यांची दोन ते अडीच वर्षे गेली. त्यांना या क्षेत्रातले बरेच काही समजत होते, मात्र पेपर लिहिताना आपण ब्लँक होतोय हे त्यांना जाणवायला लागले. पण वडिलांना हे सांगायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र एक दिवस हिंमत करून त्यांनी वडिलांना ते सांगितलेच. महत्त्वाचे म्हणजे, त्यांच्या वडिलांनी श्रीरंगांचा हा निर्णय लगेच स्वीकारला. अर्थातच, त्यांना याबाबत आश्चर्य वाटले. याबाबत बोलताना श्रीरंग देशमुख अंतरीचे गुज अलगद उलगडतात आणि म्हणतात, माझा हा स्वतःचा स्वतःसाठीचा निर्णय मी वेळीच घेतला असता, तर माझा बहुमोल वेळ वाया गेला नसता.
Leave a Reply