– राज चिंचणकर
प्रमोद प्रभुलकर आणि मधुराणी प्रभुलकर हे कलावंत दांपत्य त्यांच्या ‘मिरॅकल’ अकॅडमीतून आतापर्यंत अनेक कलाकार घडवत आले आहे. मालिका, चित्रपट, नाटक अशा क्षेत्रांत त्यांच्या हाताखालून गेलेल्या अनेक कलावंतांनी या क्षेत्रात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. याच प्रभुलकर दांपत्याच्या ‘युथट्यूब’ या नवीन चित्रपटासाठी त्यांनी भन्नाट कल्पना लढवत, त्यांच्या विद्यार्थ्यांनाच मोठी संधी दिली आहे. त्यांच्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांची वर्णी या चित्रपटात लागली आहे.

अनेक एकांकिका, नाटके, चित्रपट, विविध कार्यक्रम असे नाना उपक्रम राबविणारे प्रमोद प्रभुलकर यांचीच ही संकल्पना आहे. केवळ अभिनयच नव्हे; तर एकूणच व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे देणारे प्रमोद प्रभुलकर यांनी त्यांच्या तब्बल ३०० विद्यार्थ्यांचे स्वप्न या निमित्ताने प्रत्यक्षात आणले आहे. या चित्रपटात या सर्व विद्यार्थ्यांना अभिनय करण्याची संधी त्यांनी दिली आहे. याविषयी बोलताना ते म्हणतात, व्यावसायिक कलाकार मला यासाठी घेता आले असते; परंतु माझ्या विद्यार्थ्यांना मला पुढे आणायचे होते. व्यावसायिक गणित लक्षात घेता ही रिस्क आहे हे मला माहित होते. पण मी ती घेतली आहे. या विद्यार्थ्यांकडून मला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने मी समाधानी आहे.
Leave a Reply