– राज चिंचणकर
बॉडीबिल्डिंग आणि चित्रपट या दोन क्षेत्रांचा तसा काही थेट संबंध नाही. पण हा संबंध जोडण्याचे काम एका युवा अभिनेत्याने केले आहे. ‘सिनिअर मिस्टर एशिया’ हा किताब पटकावलेला बॉडीबिल्डर सिद्धांत मोरे याने आता मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री घेतली आहे. येत्या १५ फेब्रुवारी रोजी त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘शिवा – एक युवा योद्धा’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

सिद्धांतने या चित्रपटासाठी तब्बल ४ वर्षे मेहनत घेतली आहे. यातले सर्व स्टंट्स त्याने स्वतः दिले आहेत. त्याच्या या महत्त्वाकांक्षी भूमिकेबद्दल बोलताना सिद्धांत म्हणतो, आतापर्यंत बॉडीबिल्डिंगने मला बरेच काही दिले आहे. पण आता मी अभिनयाच्या क्षेत्रात काही वेगळे करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मी खेळाच्या क्षेत्रातून चित्रपटसृष्टीत आलो असलो, तरी यातही मला यश मिळेल अशी मला आशा आहे.
खेळ आणि आरोग्य अशा क्षेत्रांत आतापर्यंत बरेच लेखन केलेले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय मोरे यांनी अडीच वर्ष परिश्रम घेत हा चित्रपट लिहिला आहे. विजय शिंदे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सिद्धांतसोबत तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, शोभना दांडगे, जीत मोरे, बाबासाहेब सौदागर आणि दक्षिणेतील सुपरस्टार कामराज आदी कलाकार मंडळी यात आहेत. संगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी या चित्रपटात ५ गाणी दिली आहेत.
Leave a Reply