– राज चिंचणकर
शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या व्यथा कमी होताना दिसत नाहीत. अमाप कष्ट करूनही नशिबी येणारी हतबलता त्यांचे अवघे जीवन ग्रासते. मोठ्या पडद्याच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकला, तर यावर काही उपाययोजना करता येतील असे निलेश जळमकर यांना वाटले आणि त्यांनी ‘आसूड’ हा चित्रपट लिहिला. ८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाविषयी बोलताना निलेश जळमकर भरभरून त्यांचे मत मांडतात. मी मुळातच शेतकरी कुटुंबातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहित आहेत. शेतकऱ्यांना चांगले दिवस का येत नाहीत,असा प्रश्न मला कायम पडत आला आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे आणि त्याला कुठेतरी वाचा फोडावी असे मला वाटले. कथा लिहितानाच माझ्या डोळ्यांसमोर यातल्या भूमिका कुणी करायचे ते पक्के ठरले होते आणि मला ते कलाकार मिळत गेले. त्यामुळे हे कथानक अधिक भक्कम झाले आहे. हा ग्रामीण चित्रपट नाही; तर शहरी लोकांनी मुद्दाम पाहावा असा चित्रपट आहे. मी एक कलावंत आहे आणि हे माध्यम हाती धरून मी हा विषय मांडला आहे, अशी भूमिका ते मांडतात.
८ फेब्रुवारी रोजी पडद्यावर येत असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा व दिग्दर्शन निलेश जळमकर यांनी केले आहे. या चित्रपटात आघाडीचे अनेक कलावंत भूमिका रंगवत आहेत. विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत आदी कलाकार या चित्रपटा दिसणार आहेत. अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत हे दोन नवे चेहरे या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.