– राज चिंचणकर
रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, अशोक पावसकर या व अशा अनेक ज्येष्ठ मंडळींनी बालरंगभूमी खर्या अर्थाने समृद्ध केली. परंतु आधुनिक काळाच्या ओघात बालरंगभूमीला उतरती कळा लागली. साहजिकच, बालनाट्ये टिकवून धरण्यासाठी विविध संकल्पना राबविणे आवश्यक ठरले. रंगभूमीवर अनेक अचाट अशा कल्पना प्रत्यक्षात उतरवलेल्या दिसतात. विशेषतः बालनाट्यांच्या माध्यमातून याची प्रामुख्याने प्रचिती येते. याच मांदियाळीत रंगभूमीवर आता थेट ‘डायनासॉर’ची एन्ट्री होणार आहे.

मोहन चोरघे व प्रीती दळवी-चोरघे यांनी ‘जंगलबुक’ या त्यांच्या बालनाट्यातून डायनासॉर हे पात्र रंगमंचावर आणण्याचा संकल्प केला आहे. ‘इवा’ असे नामकरण असलेल्या या डायनासॉरची लांबी २० फूट आहे. आकर्षक पद्धतीने हा डायनासॉर तयार करण्यात आला आहे. या डायनासॉरसोबत ७ फूट उंची असलेला गोरिलाही या नाटकातून रंगमंचावर अवतरणार आहे. ‘बुबो’ असे या गोरिलाचे नाव आहे. विशेष म्हणजे, डायनासॉर आणि गोरिलाच्या माध्यमातून वन्यप्राणी संरक्षण, पर्यावरण आदी विषयांनाही या नाटकातून वाचा फोडण्यात येणार आहे.
Leave a Reply