– राज चिंचणकर
एखाद्या चित्रपटाची कथा सुचण्यासाठी शांत, निसर्गरम्य परिसराची वगैरे निवड अनेकजण करतात. तिथे वास्तव्य करून एखादी कथा प्रसवली जाते. पण प्रत्येकवेळी असे घडेलच असे नाही. कथा कुणाला, कुठे आणि कोणत्या परिस्थितीत सुचेल याचा काहीच नेम नाही. आता हेच बघा ना… अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा सर्व क्षेत्रांत मुशाफिरी करणारे महेंद्र तेरेदेसाई यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षी ‘डोंबिवली रिटर्न’ या चित्रपटाची कथा चक्क मुंबईच्या लोकल ट्रेनमध्येच सुचली. बरं, कथा सुचली ती सुचली; पण ती सुद्धा थेट थरारपटाच्या दृष्टिकोनातून! आता चित्रपटाचा उगमच इतक्या वास्तव पायावर झाल्यावर, त्यावर उभी राहणारी इमारत भक्कम असणार हे वेगळे सांगायची आवशक्यता नाही.

‘डोंबिवली रिटर्न’ चित्रपटावर फोकस टाकताना महेंद्र तेरेदेसाई सांगतात, मध्यमवर्गीय माणसाकडे पैसे असोत किंवा नसोत; पण त्याहीपलीकडे त्याचा एकप्रकारचा संघर्ष सतत सुरु असतो. मध्यमवर्गीय जीवनशैलीत तर मला तो कायम दिसत आला आहे. मध्यमवर्गीय माणसाची बोलणी आणि करणी यातला फरक दाखवत मी या चित्रपटात वेगळे नाट्य निर्माण करण्याचा आणि ते थरारक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
एकूणच, रसिकजन ज्या ‘डोंबिवली रिटर्न’ची वाट आतुरतेने पाहात होते; तो चित्रपट २२ फेब्रुवारी रोजी पडद्यावर येत आहे. ‘करंबोला क्रिएशन्स’ या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची संकल्पना, लेखन व दिग्दर्शन महेंद्र तेरेदेसाई यांचे आहे. या चित्रपटात संदीप कुलकर्णी व राजेश्वरी सचदेव यांच्यासह हृषिकेश जोशी, डी. संतोष, अमोल पराशर, तृष्णिका शिंदे, सिया पाटील, सुनील जोशी, शैलेश पितांबरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
या चित्रपटात चार गाणी असून चंद्रशेखर सानेकर, मुकुंद सोनावणे यांनी लिहिलेल्या या गीतांना, संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी स्वरसाज चढवला आहे. आता एकूणच चित्रपटाची एवढी सगळी तयारी झाल्यावर, २२ फेब्रुवारीपासून ‘डोंबिवली रिटर्न’ तिकीट काढून या ट्रेनचा हा प्रवास करणे केवळ रसिकांच्या हाती आहे.
Leave a Reply