‘डोंबिवली रिटर्न’   – भावविश्वातली ‘अनंत’ कल्पनारम्यता…! 

दर्जा :   *  *  *  (तीन स्टार) 
 
– राज चिंचणकर 
 
       अनेकदा चित्रपटाचे शीर्षक आणि त्या चित्रपटाचे कथासूत्र यांचा एकमेकांशी संबंध असतोच असे नाही. पण ‘डोंबिवली रिटर्न’ हा चित्रपट मात्र या  शीर्षकाला जागला आहे. तो कसा, हे जाणून घ्यायचे असल्यास, या ट्रेनचे तिकीट काढणे गरजेचे आहे. पण हे तिकीट काढताना ते ‘रिटर्न’ आहे, हे मात्र तपासून बघणे आवश्यक आहे. अन्यथा, या चित्रपटाच्याच भाषेत सांगायचे, तर या चित्रकथेच्या मूळ गाभ्यापर्यंत हा प्रवास होऊच शकणार नाही.
IMG_2046
       अनंत वेलणकर… नाव नक्कीच ओळखीचे आहे. पण नावावर जायचे कारण नाही. कोणत्याही मध्यमवर्गीय नोकरदार गृहस्थाच्या बाबतीत घडू शकेल अशी घटना या चित्रपटातल्या अनंत वेलणकर यांच्याबाबतीत घडते. आता ही घटना कोणती, याची साधी ‘हिंट’ जरी दिली; तरी या कथासूत्राचा पर्दाफाश होईल. त्यामुळे अनंत वेलणकर यांच्या आयुष्यात नक्की काय घडते आणि कोणकोणत्या वळणांवरून ते मार्गस्थ होतात, हे पडद्यावरच पाहणे इष्ट ठरेल.
       चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद महेंद्र तेरेदेसाई यांनी लिहिले असून, दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनीच उचलली आहे. एक अनोखा ‘जॉनर’ पकडत त्यांनी या चित्रपटाचे बांधकाम केले आहे. यातल्या नायकाच्या आयुष्यात घडणारी एक घटना आणि प्रेक्षकांना त्रयस्थपणे दिसणारी त्याच्याबाबतीतली अजून एक घटना, या सीमेवर त्यांनी हा सगळा ‘गेम’ खेळवला आहे. या डोंबिवली ट्रेनमधून जातानाचा प्रवास अगदीच खिळवून ठेवणारा आहे, मात्र परतीच्या प्रवासात अधेमधे काही बोगदे लागले आहेत. या काळोखाची पडछाया थोडी दूर सारता आली असती, तर हा संपूर्ण प्रवास अधिक आरामदायी झाला असता. पण शेवटी या ट्रेनने मुक्कामाच्या स्टेशनला केलेला भोज्जा मात्र लक्षणीय आहे. हातात अचानक पैसा आला, की नाकासमोर चालणाऱ्या माणसाचेही काय वाट्टेल ते होऊ शकते, असा सूर चित्रपटात आहे. पण केवळ हा एक मुद्दा म्हणजे हा चित्रपट नव्हे. कारण फक्त तशी पार्श्वभूमी वापरली असली, तरी एकूणच कथासूत्राला दिलेली ट्रीटमेंट पार वेगळी आहे.
IMG_1575
       या चित्रपटाची तांत्रिक बाजू भक्कम असल्याने ही कथा थेट अंगावर येते. उदयसिंग मोहिते यांचा कॅमेरा नजरबंदी करणारा आहे. चित्रपटाच्या फ्रेम्स सुरुवातीपासूनच मनाचा ठाव घेतात आणि चित्रपटाची उंची आपसूक वाढत जाते. योगेश गोगटे व आदित्य वारीअर यांचे संकलन चोख आहे; तर शैलेंद्र बर्वे यांचे संगीत व अनमोल भावे यांचे ध्वनी रेखांकन पूरक आहे.
       संदीप कुलकर्णी यांची अनंत वेलणकर या भूमिकेतली कामगिरी दमदार आहे. सामान्य माणसापासून एका वेगळ्याच विश्वात वावरणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा आलेख त्यांनी उत्तम दर्शवला आहे. त्यांची पत्नी, उज्ज्वलाच्या भूमिकेत राजेश्वरी सचदेवने बहारदार रंग भरले आहेत. प्रसंग खुलवण्याची त्यांची हातोटी लक्षात येते. अमोल पराशरचा श्रीधर वेलणकर उत्तम जमून आला आहे. सहजाभिनयाचे उदाहरण अमोलने यात कायम केले आहे. हृषीकेश जोशीच्या वाट्याला तुलनेने छोटी भूमिका आली असली, तरी तो त्यातही त्याचे अस्तित्त्व दाखवून देतो. तृष्णिका शिंदे, सिया पाटील आदींची योग्य साथ चित्रपटाला आहे. एकूणच थोडासा सस्पेन्स, थोडा थरार आणि मानवी भावविश्वातली कल्पनारम्यता अनुभवायची असल्यास ‘डोंबिवली रिटर्न’चा हा प्रवास करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑

<span>%d</span> bloggers like this: