* * १/२ (अडीच स्टार)
– राज चिंचणकर
अगदीच छोट्या संकल्पनेचा विस्तार करून त्यावर पूर्ण लांबीचा एखादा चित्रपट निर्माण होऊ शकतो; हे सिद्ध करण्याचे काम ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाने केले आहे. या चित्रपटाचे शीर्षकच बरेच काही सांगून जाणारे आहे आणि त्यावरून हा चित्रपट काय असेल, हा अंदाज अजिबात न चुकवता ही गोष्ट घडत गेली आहे.
अभिजीत, चंदू, भज्जी आणि गणेश या चार मित्रांमधल्या अभिजीतचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे आणि सुब्बू या दाक्षिणात्य मुलीशी ठरलेल्या त्याच्या लग्नाची तयारी दोन्ही बाजूंकडून जोरात सुरु आहे. पण लग्नाच्या दोन दिवस आधी हे चौघे मित्र क्रिकेट खेळत असताना, अभिजीतच्या डोक्याला मार बसतो आणि त्याची मोठी किंमत त्याला चुकवावी लागते. ही घटना म्हणजे या चित्रपटाचा पाया आहे आणि तसे पाहायला गेल्यास ही घटना गंभीर आहे. मात्र वरूण नार्वेकर व शिवकुमार पार्थसारथी, या अनुक्रमे पटकथा-संवाद लेखक आणि दिग्दर्शक जोडीने त्याला कॉमेडीचा तडका देत ती रंजक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण, यात येणारी वारंवारता टाळता येणे सहजशक्य होते. पुनरावृत्तीचा मारा वाढला की कंटाळा यायला लागतो, याचे व्यवधान राखणे गरजेचे होते.

या चित्रपटाचा आस्वाद घेताना, डोके थोडे बाजूला काढून ठेवणे क्रमप्राप्त आहे. निखळ आणि निव्वळ करमणूक एवढाच हेतू या चित्रपटाचा आहे; हे लक्षात घेतल्यावर इतर बाबींकडे कानाडोळा करावा लागतो. किंबहुना, चित्रपटाच्या टीमचेच तसे सांगणे असल्याचे या चित्रपटाला दिलेल्या ट्रीटमेंटवरून स्पष्ट होत जाते. कलाकारांनी मात्र हा चित्रपट उचलून धरला आहे आणि त्याची वाट सुसह्यतेकडे वळवली आहे. चित्रपटाची तांत्रिक अंगे ठीक आहेत.
डोक्याला मार लागल्यावर एखाद्याच्या बाबतीत जे काही घडेल, ते कथेच्या मागणीप्रमाणे सादर करण्याचा प्रयत्न सुव्रत जोशी याने अभिजीतच्या भूमिकेत केला आहे. ओंकार गोवर्धन याने चंदूच्या भूमिकेत छान रंग भरले आहेत. रोहित हळदीकर याचा भज्जी लक्षात राहतो. एक डोळा मिचकावण्याची लकब पकडत गणेश पंडित याने उभा केलेला यातला गणेश धमाल आहे. प्राजक्ता माळी हिला सुब्बूच्या भूमिकेत फार काही करण्यास वावच मिळालेला नाही. समीर चौघुले याचा डॉक्टर मात्र खास आहे. एकूणच, केवळ दोन घटका करमणूक हा बाज स्वीकारलेल्या या चित्रपटाकडे त्याच दृष्टीने पाहणे तेवढे हाती उरते.
———————————————————————————-
Leave a Reply