– राज चिंचणकर
सध्याचा मराठी चित्रपट आशयघनतेच्या बाबतीत वेगाने दौडत असतानाच, त्याने आता थेट ‘लॉस एंजेलिस’पर्यंत भरारी घेतली आहे आणि याला निमित्त ठरला आहे तो ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा चित्रपट! या चित्रपटाचे हे शीर्षक मराठी रसिकांना नक्कीच ओळखीचे वाटेल. कारण अभिनेते प्रशांत दामले यांनी या ओळीला दिलेला ऱ्हिदम सर्वांच्याच परिचयाचा आहे. एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची गोष्टही त्याचपद्धतीची असल्याने, या चित्रपटाचे शीर्षक हेच ठेवले गेले आहे.

आतापर्यंत चाकोरीबाहेरचे चित्रपट देणाऱ्या समृद्धी पोरे, हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटाची गोष्ट घडते तीच मुळी परदेशात आणि त्यासाठी आम्ही चित्रीकरणासाठी ‘लॉस एंजेलिस’ची निवड केली असल्याचे समृद्धी पोरे सांगतात. अभिनेता अंकुश चौधरी याची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे आणि विविध जाहिरातींतून चमकलेली झीनल कामदार या चित्रपटाची नायिका असेल. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण लॉस एंजेलिस येथे सुरु होत आहे. या निमित्ताने मराठी चित्रपट रसिकांना, मोठ्या पडद्यावरून का होईना; पण थेट लॉस एंजेलिसची सफर करण्याचा योग येणार आहे.
Leave a Reply