– राज चिंचणकर
अनेक यशस्वी मालिका व चित्रपटांचे दिग्दर्शक; तसेच अभिनेते म्हणून ओळख असलेले सतीश राजवाडे यांनी ‘स्टार प्रवाह’चे कन्टेन्ट व प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारली; तेव्हाच हा प्रवाह वेगळ्या दिशेने वाहायला लागणार याचा अंदाज आला होता. त्यांनी हा अंदाज अजिबात न चुकवता ‘जिवलगा’ या नव्या दैनंदिन मालिकेची घोषणा करत, या प्रवाहाला निश्चित दिशा दिली आहे. त्यांची ही मालिका ८ एप्रिलपासून छोट्या पडद्यावर रुजू होत आहे.

या मालिकेची म्हटली तर बरीच वैशिष्ट्ये सांगता येतील. महत्त्वाचे म्हणजे, पराग कुलकर्णी यांनी लिहिलेली या मालिकेची कथा शेवटपर्यंत ‘तयार’ आहे. म्हणजेच, या कथेला निश्चित अशी कालमर्यादा असणार हे उघड आहे. विशेष म्हणजे स्वप्नील जोशी, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर व मधुरा देशपांडे; अशा सध्याच्या काळात ‘बिझी’ असलेल्या कलाकारांची या मालिकेत प्रमुख भूमिकांवर लागलेली वर्णी लक्षात घेता, या मालिकेचा ‘पसारा’ वाढणार नाही याची काळजी सतीश राजवाडे यांनी अर्थातच घेतली असणार. या मालिकेची मूळ संकल्पनाही त्यांचीच असली, तरी दिग्दर्शकाच्या खुर्चीत मात्र ते नाहीत. प्रेमकथेच्या वळणाने जाणाऱ्या या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी उमेश नामजोशी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विद्याधर पाठारे या मालिकेची निर्मिती करत आहेत.
या मालिकेद्वारे स्वप्नील जोशी व सिद्धार्थ चांदेकर बऱ्याच वर्षांनी छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. तर, अमृता खानविलकरची ही पहिलीच दैनंदिन मालिका आहे. सेलिब्रिटी स्टारकास्ट, आश्वासक निर्मिती, ‘स्टार प्रवाह’सारखे चॅनेल आणि या सर्वांच्या मागे घट्ट पाय रोवून उभे असलेले अनुभवी सतीश राजवाडे; ही सगळी भट्टी या मालिकेच्या निमित्ताने जुळून आली असल्याने या ‘जिवलगा’ची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
Leave a Reply