– राज चिंचणकर
अलका कुबल-आठल्ये म्हणजे ‘माहेरची साडी’; हे समीकरण गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या मनात घट्ट रुजले आहे. त्याचबरोबर, त्यांचा चित्रपट म्हणजे डोळ्यांना रुमाल लावायला लागणार, असे चित्रही सर्वसाधारणपणे दिसून येते. पण आता त्यांचा येऊ घातलेला ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट मात्र या दोन्ही गोष्टींचे संदर्भ रसिकांना नव्याने पडताळून पाहायला लावणार आहे.

मराठी रुपेरी पडद्यावर अलका कुबल यांची थोड्याबहुत फरकाने असलेली ‘रडूबाई’ अशी इमेज पार बदलून टाकणारा हा चित्रपट आता त्यांच्या ओंजळीत आला आहे. या चित्रपटात भूमिका साकारताना, प्रथमच मला डोळ्यांत ‘ग्लिसरीन’ घालावे लागले नाही, असे त्या स्पष्ट करतात; तेव्हाच त्यांची ही भूमिका ‘हटके’ असणार यावर शिक्कामोर्तब होते. थोडक्यात, अलका कुबल यांचा चित्रपट असला, तरी तमाम रसिकांनी आपापले रुमाल घरी ठेवून चित्रपट पाहायला जायला हरकत नाही. डोळे ओलावण्याच्या प्रक्रियेपासून मराठी रसिकांची मुक्तता करणारा चित्रपट अखेर त्यांच्या वाट्याला आला, हेही नसे थोडके!
दुसरे म्हणजे, ‘माहेरची साडी’ या चित्रपटातल्या साड्यांचा संदर्भही अलका कुबल यांच्या बाबतीत ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाच्या निमित्ताने बदलत आहे. यात त्यांना चित्रपटभर विविध प्रकारच्या साड्या नेसायला मिळाल्या आहेत. हसरा चेहरा आणि भरजरी साड्या, अशा थाटात महाराष्ट्राच्या या लाडक्या अभिनेत्रीला पाहणे, हा सुखावह धक्का ठरणार आहे. या चित्रपटाने ही भन्नाट किमया केली असून, येत्या १२ एप्रिल रोजी अलका कुबल यांचे आगळेवेगळे दर्शन ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर घडणार आहे.
Leave a Reply