– राज चिंचणकर
कलेच्या माध्यमातून वृद्धाश्रमांतील ज्येष्ठ मंडळींना आनंद देण्याचा प्रयत्न करत आणि आपण समाजाचे काही देणे लागतो, याची जाणीव ठेवत ‘आपण आनंदयात्री’ परिवार हा बहुमोल कार्य करत आहे. वृद्ध मंडळींमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठही मिळवून देण्याचे कामही हा परिवार करत असतो. या पार्श्वभूमीवर, या परिवारातर्फे ‘आनंदोत्सव आनंदयात्रींचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, १ मे रोजी प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये संपूर्ण दिवस हा आनंदोत्सव साजरा होणार आहे. गायन, वादन, नृत्य, संगीत, काव्य, अभिनय, चित्रकला, हस्तकला असे अनेक कलाप्रकार ही ज्येष्ठ मंडळी यावेळी सादर करणार आहेत.
या ज्येष्ठ मंडळींना प्रोत्साहन देण्यासाठी रंगकर्मी हेमंत भालेकर, अनिल गवस, दिगंबर नाईक, गणेश पंडित, प्रभाकर मोरे, अरुण नलावडे, जयवंत भालेकर, सुप्रिया पाठारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमोद सुर्वे, अभय चव्हाण, सुनील खोबरेकर यांच्यासह या आनंदयात्री परिवारातील कार्यकर्त्यांनी या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन केले आहे.
‘आनंदोत्सव आनंदयात्रींचा’ या सोहळ्यात सर जे. जे. धर्मशाळा (नागपाडा), आनंद वृद्धाश्रम (पालघर), शेफर्ड विडोज (भायखळा), रामकृष्ण वृद्धाश्रम (पनवेल), पं. भाऊसाहेब व इंदुताई वर्तक आश्रम (विरार), आधारवड महिलाश्रम (कोपरखैराणे), श्रद्धानंद आश्रम (वसई), साईधाम आश्रम (खिडकाळी), स्मित वृद्धाश्रम (भिवंडी), आनंद आश्रम (नेरुळ), ऑल इज वेल (कोपरखैराणे), अशोकवन (विरार व मुलुंड) आणि ऑल सेंट होम (माझगाव) या संस्थांमधील ज्येष्ठ मंडळी सहभागी होणार आहेत.
रस्त्यावरील निराधार व्यक्तींवर उपचार करणारे डॉ. अभिजीत सोनावणे यांना या सोहळ्यात ‘सामाजिक बांधिलकी २०१९’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी बेस्ट समिती अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अनिल कोकीळ आणि पत्रकार राज चिंचणकर यांना यावेळी ‘आनंदयात्री सामाजिक कर्तव्य पुरस्कार २०१९’ देऊन गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
Leave a Reply