– राज चिंचणकर
सध्याच्या काळात स्वतःची मुले असूनही, आई-वडिलांना आश्रितासारखे जगावे लागते. अशा काही घटना समाजात प्रकर्षाने दिसून येतात. याबाबत समाजाला जागृत करण्यासाठी ‘मी.. माझे.. मला…’ या नाटकाने पुढाकार घेतला आहे. आत्मकेंद्रित वृत्तीच्याही पलीकडे जाऊन आपण समाजाचे काही देणे लागतो, असा सुसंस्कार करणारे हे नवीन नाटक आता रंगभूमीवर आले आहे.

या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केले असून, विजय गोखले यांनी दिग्दर्शन केले आहे. किशोर सावंत आणि विवेक नाईक यांच्या ‘किवी प्रॉडक्शन्स’ या नाट्यसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. विघ्नेश जोशी, विजय गोखले, किशोर सावंत, विलास गुर्जर, सुरेखा कुडची, हेमांगी राव आणि रोहित मोहिते यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अनिकेत शुभम यांचे संगीत, देवाशिष भरवडे यांचे नेपथ्य, अमोघ फडके यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. या नाटकाचे व्यवस्थापन प्रवीण दळवी यांनी सांभाळले आहे.
याबाबत बोलताना नाटकाचे निर्माते किशोर सावंत सांगतात, ज्येष्ठ मंडळींचा हा विषय समाजासमोर येणे आवश्यक वाटल्याने आणि लेखक आनंद म्हसवेकर यांच्या लेखनात मला हा मुद्दा स्पष्ट दिसल्याने मी या नाटकाची निर्मिती करायची ठरवली. वृद्धांच्या समस्या पाहता मनाला फार क्लेश होतो. हा विषय समाजापुढे मांडावा असे मला मनापासून वाटले म्हणून मी या नाटकाच्या निर्मितीला हात घातला.
दिग्दर्शक विजय गोखले म्हणतात, पंख फुटलेल्या मुलांचे त्यांच्या आई-वडिलांविषयी काही कर्तव्य आहे की नाही? हे मांडण्यासाठी नाटकासारखे उत्तम व्यासपीठ नाही. नाटकाचा विषय मला खूप भावला आणि म्हणून मी हे नाटक दिग्दर्शित करायचे नक्की केले. स्वतःपलीकडे जाणारे, सामाजिक भान जपणारे हे नाटक आहे.
सध्या कुटुंबव्यवस्था ढासळत चालली आहे. एकत्र कुटुंबपद्धती नाहीशी होत चालली आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली आहे. हीच आपली कौटुंबिक प्रगती आहे का; असा प्रश्न उपस्थित करत, वृद्धापकाळात आपल्याला मुलांनी सांभाळावे यासाठी ज्येष्ठ मंडळींना कोर्टात जावे लागते, ही आपल्या संस्कृतीची व संस्कारांची हार आहे असे लेखक आनंद म्हसवेकर याविषयी संवाद साधताना स्पष्ट करतात.
Leave a Reply