– राज चिंचणकर
संतोष पवार हा मराठी रंगभूमीवरचा एक अवलिया कलावंत! त्याच्या कारकिर्दीत त्याने विविध प्रकारची नाटके गाजवली असली, तरी सुमारे २० वर्षांपूर्वी आलेले ‘यदाकदाचित’ हे त्याचे नाटक रंगभूमीवर धमाल उडवणारे ठरले होते. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून पुढे प्रसिद्धीस आलेल्या संतोष पवारने या नाटकाचे सुमारे चार हजार प्रयोग केले होते. विनोदाचा धिंगाणा घालणारे हे नाटक त्यावेळी तुफान लोकप्रिय झाले होते. नंतर काही कारणास्तव या नाटकावर पडदा पडला होता. परंतु, संतोष पवारच्या मनातून हे नाटक काही केल्या जात नव्हते. त्याच्या या अस्वस्थतेतूनच त्याच्या ‘यदाकदाचित रिटर्न्स’ या नवीन नाटकाचा जन्म झाला असावा.

येत्या १८ मे रोजी संतोष त्याचे हे नवीन नाटक रंगभूमीवर आणण्यास सज्ज झाला आहे. अनेक लोकप्रिय नाटके देणारी ‘श्री दत्त्तविजय प्रोडक्शन’ ही प्रतिष्ठित नाट्यसंस्था ‘यदाकदाचित रिटर्न्स’ हे नाटक रंगभूमीवर आणत आहे. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व गीते अशी जबाबदारी संतोष पवार यानेच सांभाळली आहे. ज्येष्ठ निर्माते दत्ता घोसाळकर यांच्यासह अजय पुजारी (नेपथ्य), चेतन पडवळ (प्रकाशयोजना), प्रणय दरेकर (संगीत) अशी टीम या नाटकासाठी कार्यरत झाली आहे. विशेष म्हणजे काही नाटके, चित्रपट, मालिकांमध्ये चमकलेले तब्बल १६ युवा कलाकार या नाटकात भूमिका रंगवत आहेत. या नाटकाची तालीम सध्या जोरात सुरु असून, रसिकांना संतोषकडून हे ‘रिटर्न गिफ्ट’ मिळण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे.
Leave a Reply