– राज चिंचणकर
चित्रपट, नाटक, मालिका क्षेत्रांत कलावंतांसाठी ‘मेक-अप’ हा महत्त्वाचा भाग असतो. या ‘मेक-अप’मुळे चेहऱ्यात आमूलाग्र बदल सहज घडवता येऊ शकतो. अनेक कलाकारांच्या बाबतीत या ‘मेक-अप’ची ही किमया रसिकांना आतापर्यंत विविध भूमिकांद्वारे पाहायला मिळाली आहे. अशीच एक न्यारी किमया ‘वन्स मोअर’ या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा प्रयोग ज्यांच्यावर केला आहे, त्या कलावंताला रसिक अजिबात ओळखू शकणार नाहीत; इतका हा ‘मेक-अप’ आणि एकूणच ‘गेट-अप’ उत्कृष्ट वठला आहे. आता हा कलावंत कोण आहे, हे ओळखण्याची जबाबदारी रसिकांची आहे.

‘वन्स मोअर’ या चित्रपटात एक विचित्र व्यक्तिरेखा आहे. त्यानुसार एका स्त्रीला, पुरुष बनवायचा होता. ती व्यक्तिरेखाच पुरुषाची होती. हे प्रचंड मोठे आव्हान होते आणि ते पेलण्यासाठी तितक्याच ताकदीची अभिनेत्री हवी होती. विचाराअंती ‘वन्स मोअर’च्या टीमकडून एका अभिनेत्रीचे नाव पक्के केले गेले. कोण असेल ही अभिनेत्री…?
१ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘वन्स मोअर’ या मराठी चित्रपटासाठी या अभिनेत्रीने आजोबांचे पुरुषी रूप धारण केले आहे. या भूमिकेसाठी ‘त्या’ अभिनेत्रीने किती श्रम घेतले असतील, याचा अंदाज सोबतच्या छायाचित्रातून सहज येतो. या चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून एकाचवेळी स्त्री व पुरुष अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या सशक्त कलावंताची आवश्यकता होती. या भूमिकेला ही अभिनेत्री नक्की न्याय देऊ शकेल, अशी खात्री बाळगत दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी ‘त्या’ अभिनेत्रीला या भूमिकेची गरज समजावून सांगितली. भूमिकेचे आव्हान व त्यातले वेगळेपण लक्षात घेत ‘त्या’ अभिनेत्रीने या भूमिकेला होकार दिला.
कमल हसन यांना बऱ्याच सिनेमांमध्ये ‘गेट-अप’ करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध मेक-अप आर्टिस्ट रमेश मोहंती, कमलेश आणि श्रीनिवास मेनगु यांनी हा मेक-अप केला आहे. रमेश आणि कमलेश यांनी प्रॉस्थेटिक मेक-अपच्या सहाय्याने या अभिनेत्रीला आजोबांचे रूप बहाल केले आहे. तिला आजोबांचे हे रूप मिळवून देण्यात कॉस्च्युम्सचाही मोठा वाटा आहे. अनेक चित्रपट व नाटकांसाठी वेशभूषा साकारणाऱ्या चैत्राली डोंगरे यांनी हा अफलातून कॉस्च्युम या व्यक्तिरेखेसाठी तयार केला आहे. आता, या सर्व आर्टिस्ट्सना सहकार्य करणारी ‘ती’ अभिनेत्री सुद्धा तेवढ्याच ताकदीची व हिंमतीची असली पाहिजे, हे ओघाने आलेच.
सोबतचा फोटो नीट निरखून पाहिला, तरीही तिची ओळख काही पटत नाही ना? साहजिकच, याचा पोलखोल करणे आवश्यक ठरते. तर…….. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून, त्या आहेत; आतापर्यंत विविध भूमिकांची सशक्त छाप रसिकांवर पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी! धक्का बसला ना…? तो तसाच कायम राहू द्या. कारण १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर, पडद्यावर त्यांचा हा एकूणच ‘गेट-अप’ प्रत्यक्ष बघून अजून धक्के बसणार हे निश्चित आहे.
Leave a Reply