
– राज चिंचणकर
‘कॉन्सर्ट किंग’ म्हणून हेमंतकुमार महाले यांची संगीतक्षेत्रात ओळख आहे; परंतु आता त्यांनी एका वेगळ्याच दिशेचा प्रवास सुरु केला आहे. सध्या त्यांनी एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. पण एवढे करूनच ते थांबलेले नाहीत; तर या चित्रपटाची कथा व दिग्दर्शनही त्यांचेच आहे. ‘व्हॉट्सअप लव’ या चित्रपटासाठी त्यांनी ही जबाबदारी उचलली आहे. येत्या १२ जुलै रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, ऐन पावसाळ्यात या चित्रपटाच्या माध्यमातून संगीताची बरसात होणार आहे.
या चित्रपटाची तशी अनेक वैशिष्टये आहेत. यात एकूण ५ गाणी आहेत. अर्थात, ‘कॉन्सर्ट किंग’ असलेल्या व्यक्तीच्या चित्रपटात गाण्यांचा तडका नसता तर ते नवल ठरले असते. तर, यात असलेल्या ५ गाण्यांना ज्यांनी स्वर दिला आहे; त्यात चक्क ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचा समावेश आहे. आशा भोसले यांनी या चित्रपटासाठी गाणे गात या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. त्यांच्यासह जावेद अली, श्रेया घोषाल, पायल देव आणि सुफी गायक शबाब साबरी यांनीही यातली गाणी गायली आहेत. नितीन शंकर यांनी ही सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. अलीकडेच, या चित्रपटाच्या संगीताचे अनावरण करण्यात आले.
राकेश बापट व अनुजा साठे ही जोडी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. त्यांच्यासह इराणी अभिनेत्री सारेह फर हिची भूमिका हे या चित्रपटाचे आगळे वैशिष्ट्य आहे. अनुराधा राजाध्यक्ष, पल्लवी शेट्टी, अनुप चौधरी आदी कलावंतही या चित्रपटात आहेत. अजिता काळे यांनी या चित्रपटासाठी पटकथा व संवादलेखन केले आहे. ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुवर्णा सुरेश यांच्या कॅमेऱ्याची कमाल या चित्रपटात पाहता येणार आहे. मांडू गडावर चित्रीत झालेले एक गाणे हा या चित्रपटातला आकर्षणाचा भाग आहे.
सध्याच्या काळात ‘व्हॉट्सअप’ हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे आता ‘व्हॉट्सअप लव’ असेच शीर्षक असलेल्या या चित्रपटातून नक्की काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. या सगळ्याचा उलगडा १२ जुलै रोजी आता थेट पडद्यावरच होणार आहे.
Leave a Reply