* * * (तीन स्टार)
– राज चिंचणकर
लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयासह चित्रपटाचे एकूणच क्राफ्टिंग उत्तम जुळून आले की संबंधितांना ‘स्माईल प्लीज’ असे वेगळे उद्देशून सांगावे लागत नाही. आपोआपच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित फुलते आणि कामाचे चीज झाल्याचे समाधान त्यांना मिळते. आशयघनता हे मराठी चित्रपटांचे वैशिष्ट्य आहेच आणि ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट या आशयाची घनता अजूनच वाढवतो. एका महत्त्वाच्या विषयाला घातलेला हात, त्यायोगे समाजात जाणारा सकारात्मक संदेश आणि हे सर्व मांडताना कुठेही काही ‘ग्रेट’ वगैरे करत असल्याचा न आणलेला आव; यामुळे हा चित्रपट दखल घेण्याजोगा ठरतो.

नंदिनी, शिशिर व त्यांची मुलगी नुपूर या तिघांची ही गोष्ट असली, तरी त्यात इतर अनेक घटक महत्त्व राखून आहेत. नंदिनी ही उत्तम फोटोग्राफर आहे. काही कारणामुळे नंदिनी व शिशिर विभक्त झाले आहेत. नंदिनी तिच्या वडिलांकडे राहते; तर नुपूर शिशिरकडे राहते. अचानक नंदिनीच्या आयुष्यात असे काही वळण येते की त्याची पडछाया तिचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व व्यापून टाकते. तिच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या या स्थितीला सामोरे जाण्याची वेळ तिच्या कुटुंबियांवर येते. एकीकडे नंदिनीचा एकूणच प्रवास थबकल्यासारखा वाटत असतानाच, तिच्या भावविश्वात एक पाहुणा अनाहूतपणे टपकतो आणि हे ‘स्माईल प्लीज’ खऱ्या अर्थाने चेहरा खुलवते.
दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी चाकोरीबाहेरचा विषय हाताळत एक चांगला चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो सफल झाला आहे. विक्रम फडणीस व इरावती कर्णिक या दोघांनी मिळून बांधलेली पटकथा उत्तम आहे आणि इरावतीचे संवाद त्यात चपखल बसले आहेत. मुळात, दिग्दर्शक म्हणून विक्रम फडणीस यांनी या कथानकातल्या भावभावनांचे तरंग ज्या तऱ्हेने विविध फ्रेम्समध्ये पकडले आहेत; त्याला दाद द्यावी लागेल. उगाच कसलाही आवेश वगैरे न आणता, थेट विषयाच्या गाभ्याला भिडण्याचे त्यांचे कसब यातून दिसून येते. अर्थात, यात काही डावे-उजवे नक्कीच आहे; परंतु चित्रपटाला दिलेली एकंदर ‘ट्रीटमेंट’ पाहता त्यात ते सहज विरघळून गेले आहे.

नंदिनी ही या चित्रपटातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे आणि मुक्ता बर्वे हिने ही नंदिनी ठोस उभी केली आहे. या व्यक्तिरेखेच्या थेट अंतरंगात डोकावत आणि या व्यक्तिरेखेच्या आत्म्याशी एकरूप होत तिने साकारलेली ही नंदिनी लक्षात राहण्याजोगी आहे. महत्त्वाचे म्हणजे, अलीकडे, पडद्यावर लग्नसोहळ्यांत अडकलेल्या मुक्ताने या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने मुक्त श्वास घेतला आहे. प्रसाद ओक याचा शिशिरही छाप पाडून जातो. त्याच्या हटके स्टाईलने त्याने हा शिशिर रंगवला आहे आणि या कथानकात तो फिट्ट बसला आहे. चित्रपटांत भावखाऊ भूमिका सहज ज्याच्या वाट्याला येतात, त्या ललीत प्रभाकर याच्यासाठी हा चित्रपटही अपवाद ठरलेला नाही. ज्याच्याविषयी ‘सॉफ्ट कॉर्नर’ निर्माण होईल असा यातला विराज त्याने सहजरित्या रंगवला आहे. नुपूरच्या भूमिकेत वेदश्री महाजन हिने आश्वासक कामगिरी बजावली आहे.
एखाद्या कलाकाराची अचूक निवड म्हणजे काय, हे या चित्रपटातल्या अप्पांची भूमिका रंगवणाऱ्या सतीश आळेकर यांच्या निमित्ताने ठोस अधोरेखित होते. तसे पाहायला गेल्यास, ही व्यक्तिरेखा कथानकाच्या मुख्य प्रवाहापासून थोडी बाजूला असली, तरी सतीश आळेकर यांनी या अप्पांचे विश्व ताकदीने गडद केले आहे. तृप्ती खामकर यासुद्धा त्यांचे अस्तित्त्व ठाशीवपणे दाखवून देतात. अदिती गोवित्रीकर यांना यात फारसा वाव मिळालेला नाही. मिलिंद जोग यांचे कॅमेरावर्क, मंदार चोळकर याची गीतरचना व रोहन-रोहन यांचे संगीत; या टीमवर्कने या चित्रपटाचा आलेख उंचावला आहे. मेंदूच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या आजाराने त्रस्त असलेल्यांना समर्पित केलेले यातले गाणे आणि त्यादृष्टीने केलेले समाज प्रबोधनही महत्त्वाचे आहे. चाकोरीबाहेच्या विषयाला घातलेला हात आणि त्यायोगे एकूणच नात्यांची केली गेलेली उकल, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
Leave a Reply