* * १/२ (अडीच स्टार)
– राज चिंचणकर
‘लालबत्ती’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून काही अंदाज नक्कीच बांधता येतात. पण बांधलेल्या अंदाजांची दिशा चुकते, तेव्हा चित्रपटाचे वेगळेपण ठसते. आडाखे अगदी अचूक ठरले, तर त्यात उत्सुकता ती काय राहणार? वास्तविक, ‘लालबत्ती’ या शब्दावरून काही गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मात्र हा चित्रपट त्याही पलीकडे जाऊन या ‘लालबत्ती’चा अनोखा संदर्भ स्पष्ट करतो.

पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित कथानक हा या चित्रपटाचा गाभा आहे. क्यू.आर.टी. अर्थात शीघ्र कृती दलाच्या कमांडोंवर ही कथा बेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी एस.बी.पवार यांच्या नेतृत्वाखाली ही टीम कार्यरत आहे. या दलात अशी एक घटना घडते, की त्यावरून एस.बी.पवार यांना पोलिसांमधल्या संवेदनांची जाणीव होते. त्यातच या दलात घुम्यासारख्या वावरणाऱ्या गणेश या कमांडोच्या पार्श्वभूमीची भर पडते आणि एस.बी.पवार काही ठोस निर्णय घेतात. त्याबरहुकूम होणारी कार्यवाही म्हणजे ही ‘लालबत्ती’ आहे.
करड्या शिस्तीतल्या या खाकी वर्दीच्या आत एक माणूस सुद्धा असतो, याची जाणीव करून देणारी ही कथा व पटकथा अभय दखणे यांनी बांधली आहे. मराठी चित्रपटविश्वात चाकोरीबाहेरची कथा मांडण्याचे काम त्यांनी या निमित्ताने केले आहे आणि त्यादृष्टीने हा चित्रपट वेगळा ठरतो. मात्र ही पटकथा काही ठिकाणी विस्कळीत झाल्यासारखी वाटते. मुळात यातले कमांडो ज्या ‘मिशन’साठी एकत्र येऊन लढायचे ठरवतात; ते उद्दिष्ट तकलादू आहे. हे लक्ष्य अधिक ठोस असते, तर या कमांडोंचे श्रम खऱ्या अर्थाने सार्थकी लागले असते. पोलिसांतल्या संवेदनशीलतेचा तपास अजून खोलवर जाऊन करता येणेही शक्य होते. काही व्यक्तिरेखा आणि प्रसंग ओढूनताणून आणल्यासारखे वाटतात. अरविंद जगताप यांच्या संवादांत मात्र ‘जान’ आहे आणि त्यामुळे चित्रपटाची ही भट्टी बऱ्यापैकी सुसह्य झाली आहे.

दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी उपलब्ध सामग्रीवर खाकी वर्दीतले हे माणूसपण उभे केले आहे. यातल्या व्यक्तिरेखांना ‘कडक’ साच्यात मांडण्याचे त्यांचे कसब यातून दिसून येते. कृष्णा सोरेन यांचा कॅमेरा यात उत्तम फिरला असून, त्यांचे छायांकन ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. नीलेश गावंड यांचे संकलन आणि अविनाश-विश्वजीत यांचे संगीत ठीक आहे.
यातल्या कलावंतांनी हा चित्रपट सक्षम खांद्यांवर तोलून धरला आहे. मंगेश देसाई याने त्याच्या ओंजळीत येणारी प्रत्येक भूमिका ही कायम लक्षात राहण्याजोगीच असावी, असा पणच केला असावा. कारण तसे वाटण्याइतका यातला एस.बी.पवार हा पोलीस अधिकारी त्याने कडक रंगवला आहे. या हरहुन्नरी नटाने पोलीस डिपार्टमेंटच्या कडक शिस्तीपासून, संवेदनशीलच्या सीमेपर्यंत त्याच्या अभिनयाची रेंज दाखवून दिली आहे. रमेश वाणी यांनी इन्स्पेक्टर चव्हाण या व्यक्तिरेखेत दमदार रंगकाम करत ही भूमिका लक्षवेधी केली आहे. कमांडो गणेशची भूमिका तेजस या अभिनेत्याने आश्वासकरित्या उभी केली आहे. भार्गवी चिरमुले, मनोज जोशी, विजय निकम, छाया कदम, मीरा जोशी, अनिल गवस आदी कलावंतांची साथ या चित्रपटाला लाभली आहे. चित्रपटाचा शेवटही बरेचकाही सांगून जातो आणि हा ‘दि एन्ड’ सुन्न करणारा आहे.
Leave a Reply