– राज चिंचणकर
विनोदाच्या विविध अंगांना स्पर्श करत स्वतःची खास ओळख कायम केलेले अभिनेते भालचंद्र (भाऊ) कदम यांचा ‘व्हीआयपी गाढव’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ‘कल्पराज क्रिएशन्स’ प्रस्तुत, संजय पाटील दिग्दर्शित या चित्रपटात भाऊ कदम हटके भूमिकेत दिसणार आहेत. १३ सप्टेंबर रोजी पदड्यावर येत असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने भाऊ कदम यांच्याशी साधलेला विशेष संवाद…

दादा कोंडके पॅटर्नचा चित्रपट तुम्ही करत आहात आणि यातल्या तुमच्या व्यक्तिरेखेचे नावही ‘गंगाराम’ असे आहे; हा योगायोग आहे का?
– गंगाराम म्हटले की दादा कोंडके आठवतातच. पण यातली माझी भूमिका दादा कोंडके यांची नाही. हा चित्रपट बघून, विशेषतः यातले माझे गाणे बघितल्यावर तुम्हाला दादा कोंडके यांची आठवण मात्र नक्की होईल. गावरान, ठसकेबाज असे हे कथानक आहे. यात व्हीआयपी कल्चर आहे. आता व्हीआयपी कल्चर म्हणजे काय, असा प्रश्न मलाही पडला होता. यात काम करून मी तो प्रश्न सोडवला. तुम्हाला मात्र चित्रपट पाहून तो सोडवायचा आहे.
विनोदी भूमिकाच करायची असे ठरवले होते का?
– हो. कारण माझी ओळख विनोदी कलाकार म्ह्णूनच आहे. चित्रपटात भाऊ आले की धमाल असणार, अशी लोकांची खात्री असतेच. त्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. विनोदाने ठासून भरलेला आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा चित्रपट आहे. सर्वजण हा चित्रपट नक्कीच एन्जॉय करतील.

तुम्ही आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. पण यात ग्रामीण बाजाची भूमिका रंगवताना विशेष काही केले का?
– गावरान पद्धतीच्या कथेवर माझे मनापासून प्रेम आहे. अशा कथा मला खूप आवडतात. मला गावच्या मातीतली कला जगायला आवडते. त्यामुळे अशा कथेची मी वाट पाहातच होतो. गावरान बाज हा माझ्या आवडीचा विषय आहे. यातली भाषाही छान आहे आणि ती अगदी घरातली वाटते.
या चित्रपटाचे शूटिंग करताना तुम्ही अनेक रात्री झोपला नाहीत. काय किस्सा आहे हा?
– माझ्या हातात उपलब्ध असणारे दिवस सांभाळत आणि या दिवसांची कसरत करत मला हे शूटिंग करायचे होते. टीव्ही आणि माझे सुरु असलेले नाटक, यातून मार्ग काढत मी हे शूटिंग केले आहे. रात्री उशिरापर्यंत मी यासाठी काम केले. कमी दिवसांत जास्त काम करायचे होते. त्यामुळे रात्रीसुद्धा मी या चित्रपटाचे शूटिंग करत होतो.
नाटक जास्त आवडते की चित्रपट?
– खरं सांगायचं तर, नाटक प्रथम आवडते; मग चित्रपट! नाटकामुळे रियाझ होतो. नाटकामुळे आपण ‘तयार’ होतो. त्यामुळे नाटक खरंच ग्रेट आहे.
Leave a Reply