– राज चिंचणकर
‘पांडू’ म्हटला की सध्या ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेची आठवण होते. यातली ‘पांडू’गिरी रसिकांच्या पसंतीस उतरली असतानाच, या मालिकेत दत्ता ही व्यक्तिरेखा रंगवणारे सुहास शिरसाट हेच आता ‘पांडू’गिरी करणार आहेत. थांबा… वेगळा काहीतरी निष्कर्ष काढू नका! सुहासची ही ‘पांडू’गिरी मालिकेत नव्हे; तर एका वेब सिरीजमध्ये दिसणार आहे. ‘पांडू’ असेच या वेब सिरीजचे शीर्षक असून, यात सुहास शिरसाट भूमिका रंगवत आहेत.

मालिकेत दत्ता ही व्यक्तिरेखा साकारतानाच, सुहास यांनी ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सिरीजही केली. त्यानंतर ते पुन्हा एकदा वेब सिरीजच्या वळचणीला आले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणतात, ‘पांडू’ म्हणजे पांडुरंग… जो कायम आपल्या पाठिशी उभा असतो. तसेच पोलिस हे सुद्धा आपल्या पाठिशी उभे असतात. पोलिसांमधली माणूसकी, यावर या वेब सिरीजमधून प्रकाश टाकण्यात आला आहे.
‘पांडू’ या वेब सिरीजचा ट्रेलर आता प्रदर्शित करण्यात आला असून, २० सप्टेंबरपासून ही वेब सिरीज ‘एम एक्स प्लेयर’वर पाहता येणार आहे. सारंग साठे दिग्दर्शित या वेब सिरीजमध्ये सुहाससोबत ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के यांचीही भूमिका आहे. दोन धाडसी पोलिसांची ही जोडी आता या वेब सिरीजमध्ये काय कमाल दाखवणार, याची उत्सुकता वाढली आहे.
——————————————————————————————————
Leave a Reply