– राज चिंचणकर
अनेकविध भूमिकांमध्ये रंगणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह, अभिनेता भरत जाधव आणि सुबोध भावे आता पडद्यावर एकत्र चमकणार आहेत. ‘आप्पा आणि बाप्पा’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून, ११ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने अभिनयातले हे त्रिकूट प्रथमच एकत्र दिसणार आहे. या त्रिकूटातल्या जोड्या मिळून त्यांनी यापूर्वी एकत्र काम केले असले, तरी या तिघांची मोट आता एकाच चित्रपटात बांधली गेल्याचे या चित्रपटात प्रथमच दिसून येईल. या तिघांच्या जोडीला अभिनेत्री संपदा कुलकर्णी सुद्धा यात भूमिका साकारत आहे.

चित्रपटाच्या शीर्षकानुसार यात ‘बाप्पा’, म्हणजेच सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन होणार आहे आणि यातल्या कलाकारांवर गणरायाची कृपादृष्टी झालेली या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. आता एकंदर या हटके बाजामुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे. यात ‘बाप्पा’ कोण हे समजले असले, तरी यातला ‘आप्पा’ कोण आणि त्याच्यावर नक्की कोणता प्रसंग येऊन ठेपला आहे, याचे उत्तर मिळण्यासाठी अर्थातच ११ ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे.