– राज चिंचणकर
अभिनेता शंतनू मोघे याने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज साकारले आहेतच; परंतु आता तो थेट समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत दर्शन देण्यास सज्ज झाला आहे. II श्री राम समर्थ II या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून तो हे शिवधनुष्य पेलण्यास सिद्ध होत आहे. १ नोव्हेंबरपासून त्याचा हा आगळा अवतार पडद्यावर पाहता येणार आहे. या भूमिकेच्या निमिताने शंतनू मोघे याच्याशी साधलेला संवाद…

समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारताना तुझ्या काय भावना आहेत?
ही भूमिका करताना आनंद तर निश्चितच आहे; परंतु त्याचबरोबर अभिमान आणि स्वाभिमानही आहे. समर्थ रामदास स्वामींसारखी एक व्यक्तिरेखा मला साकारायला मिळतेय, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल.
छत्रपती शिवाजी महाराज ते समर्थ रामदास स्वामी हा प्रवास कसा होता?
खूपच छान होता हा सगळा प्रवास! या दोन्ही व्यक्तिमत्त्वांबद्दल म्हणायचे, तर त्यांच्यात एक समान धागा होता आणि तो म्हणजे देश व धर्म! एक लढवय्या होता; तर एक प्रचारक व प्रसारक होता. त्यांचे विचार सारखेच होते; मात्र त्यांनी अवलंबलेले मार्ग वेगळे होते. धर्मरक्षणाचा विडाच त्यांनी उचलला होता. त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांची वैचारिक बैठक पक्की होती. समर्थ रामदासांचे साहित्य असू दे, त्यांच्या आरत्या असू दे; या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार लोकांसमोर मांडले. असे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर घेऊन येताना खूप आनंद वाटत आहे.
छत्रपतींची राजेशाही वस्त्रे ते स्वामींची भगवी कफनी, असा फरक असताना ही व्यक्तिमत्त्व तुझ्या अंगात किती भिनली?
नक्कीच भिनली. महाराज स्वराज्याचे छत्रपती होते, पण रयतेचा सच्चा मावळा म्हणूनच त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली. आऊसाहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी छत्रपतीपद स्वीकारले. तो एक प्रवासच वेगळा होता. रामदास स्वामी यांनी तर कुणाच्याही अध्यातमध्यात न जाता, मला माझा प्रसार, प्रचार करायचा आहे; याकडे लक्ष पुरवले. यासाठीच त्यांनी बहुधा हे रूप धारण केले असावे.

ही भूमिका रंगवताना स्वामींचे ‘मनाचे श्लोक’ किती आचरणात आणलेस?
स्वामींचे विचार नक्की काय आहेत, हे समजून घेण्यासाठी ‘मनाचे श्लोक’ वाचत गेलो, त्यांचे मनन करत गेलो. जी व्यक्तिरेखा आपण साकारणार आहोत; तिचे आचारविचार काय आहेत, हे कळले की ती व्यक्तिरेखा नीट उभी करता येते.
रामदास स्वामींच्या भूमिकेनंतर पुढे काय ठरवले आहेस?
खरं तर आतापर्यंत मी कधीच कुठली भूमिका ठरवून केलेली नाही. पण काही चित्रपटांची प्रोजेक्ट्स आता सुरु झाली आहेत आणि त्यात विविध प्रकारच्या भूमिका मी करत आहे.
Leave a Reply