– राज चिंचणकर
मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या मातोश्रींच्या सन्मानाचा दुर्मिळ योग ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेच्या निमित्ताने जुळून आला आणि ‘आई’ नावाचा संवेदनशील कोपरा अधिकच हळवा झाला. आईपणाच्या भावविश्वाचा मागोवा घेणारी ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सुरु झाली आहे आणि या मालिकेच्या टीमने असा आगळावेगळा सन्मान करत अनोखा पायंडा पाडला.
‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत आईची, अर्थात अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत आहे. मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले आदी कलाकारही या मालिकेत भूमिका रंगवत आहेत. या मालिकेच्या शुभारंभाच्या निमित्ताने, या टीमने थेट पत्रकारांच्या मातोश्रींनाच साद घालण्याची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षातही आणली.
त्याप्रमाणे, पत्रकारांच्या मातोश्रींचा सन्मान खुद्द त्या-त्या पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला आणि या सोहळ्यात आईपणाचा वेगळा पैलू उलगडला गेला. रोजच्या कामाच्या धावपळीत दुर्लक्ष होत असलेल्या आणि ‘आई कुठे काय करते?’ या संभ्रमात अडकलेल्यांच्या दृष्टीसमोरचा पडदा यावेळी आईच्या ममत्वात पार चिंब होऊन गेला. मालिकेतल्या मधुराणी गोखले-प्रभुलकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे या कलाकारांसह, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड सतीश राजवाडे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. या मंडळींनी सांगितलेल्या त्यांच्या ‘आई’बद्दलच्या आठवणींनी, या चमकत्या ताऱ्यांच्या आयुष्यातल्या सर्वसामान्यपणाचे प्रतिबिंबही या सोहळ्यात मुक्तपणे सांडत गेले.
Leave a Reply