– राज चिंचणकर
कोणत्या कलाकृतीची लय कुणाला कधी साधता येईल, हे सांगणे कठीणच! अशातच तो ‘रंगभूमीवरचा विक्रमादित्य’ असेल, तर त्याला अधिकच महत्त्व प्राप्त होते. रंगभूमीवर विविध विक्रम प्रस्थापित करणाऱ्या प्रशांत दामले यांच्या बाबतीत असेच काहीसे घडले. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्या १० वर्षांपूर्वीच्या गाण्याची आठवण प्रशांत दामले यांना अचानक झाली आणि त्यांनी त्या गाण्याला नवे रूप देत थेट ‘प्रशांत’ लय साधली. या गाण्याच्या निमित्ताने कविवर्य मंगेश पाडगावकर यांची लेखणी आणि यशवंत देव यांचा स्वरसाज यांना सोशल मिडियावर एकत्रित ‘दामले टच’ लाभला आहे. ‘तू म्हणशील तसं!’ या नाटकाच्या निमित्ताने या योग जुळून आला आहे.

प्रशांत दामले यांना १० वर्षांपूर्वी एकदा यशवंत देव यांचा फोन आला आणि त्यांनी दामलेंना भेटायला बोलावले. त्यादिवशीचा शिवाजी मंदिरचा प्रयोग रंगवून प्रशांत दामले यशवंत देवांच्या घरी पोहचले. दामलेंना देवांनी पाहिले आणि त्यांनी पेटी हाती घेऊन दामलेंना ‘आता गा’ अशी आज्ञा दिली. त्याबरहुकूम, दामलेंनी जुनी गाणी गायला सुरुवात केली. मध्येच देवांनी एक नवेकोरे चुरचुरीत गाणे घेतले आणि ते दामलेंना म्हणाले, हे गाणे पाडगावकरांनी लिहिले आहे आणि ते तुला गायचे आहे. वर, मला गाणे ‘म्हणणारा नकोय’ मला ‘गाणे बोलणारा हवा’ आहे, असे देव यांनी स्पष्ट केले. देवांनी दामलेंचा आत्मविश्वास वाढवला आणि मग त्या गाण्याच्या तालमी सुरु झाल्या.

ही घटना सांगताना प्रशांत दामले म्हणतात, १०-१२ वर्षांपूर्वी मंगेश पाडगावकरांनी हे गाणे लिहिले असले, तरी त्यातला प्रत्येक शब्द त्यावेळीच नव्हे; तर आजही लागू होतो. साहजिकच या गाण्याची भुरळ माझ्यावर पडली आणि हे गाणे रेकॉर्ड करायचे मी ठरवले. वास्तविक, रेकॉर्डिंगच्या वेळी दामलेंना दडपण आले होते; कारण त्यावेळी पाडगावकर स्वतः हजर होते. मात्र दोन टेकमध्ये दामलेंकडून त्यांनी ते गाणे परिपूर्ण करून घेतले. रेकॉडिंग झाल्यावर यशवंत देव आणि मंगेश पाडगावकर यांच्या पसंतीस ते गाणे उतरले आणि त्यांनी दामलेंना शाबासकी दिली. प्रशांत दामले यांनी त्यांची निर्मिती असलेल्या ‘तू म्हणशील तसं!’ या नाटकात भूमिका करण्याचे मनावर घेतले नसले; तरी या नाटकाचे औचित्य साधून सोशल मिडियाच्या माध्यमातून, हे गाणे रसिकांच्या दरबारी रुजू करत त्यांनी या गाण्याला ‘दामले टच’ मिळवून दिला आहे.
Leave a Reply