* * * १/२ (साडेतीन स्टार)
– राज चिंचणकर
मराठी चित्रपट आशयघनतेच्या बाबतीत वरच्या स्तरावर जाऊन पोहोचला आहे आणि त्यादृष्टीने मनाला भिडतील असे आशय व विचार मराठी चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. चित्रपट हे माध्यम मुख्यत्वेकरून कॅमेर्याचे आहे आणि त्याद्वारे कलाकृतीची उंची कमालीची वाढवण्याचे सामर्थ्य या तंत्रज्ञानात आहे. जरी एखादी साधी गोष्ट चित्रपटातून सांगण्यात येत असली, पण तिला उत्तम दृष्टिकोन व तंत्रज्ञानाची जोड मिळाली; तर काय घडू शकते याचे उदाहरण म्हणजे ‘म्होरक्या’ हा चित्रपट आहे.

या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम न फ्रेम थेट संवाद साधत बोलत राहते. कलाकारांच्या तोंडी अतिशय कमी संवाद असूनही, या ‘फ्रेमिंग’च्या माध्यमातून चित्रपटाची कथा आणि आशय मनाला भिडतो. महत्त्वाचे म्हणजे, इतकी सफाई असणारा चित्रपट एक सरळमार्गी गोष्ट सांगत जातो. हा चित्रपट पूर्णतः ग्रामीण बाजाचा आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने बांधलेल्या या चित्रपटाला दिग्दर्शकीय दृष्टिकोनाद्वारे मिळालेली ही भेटच म्हणावी लागेल.

अशोक उर्फ अश्या या शाळकरी मुलाची ही साधी-सरळ अशी कथा आहे. समाजाच्या तळागाळात वाढलेल्या अशोकचा दिवस, मेंढ्या हाकण्यात व्यतीत होतो. अभ्यासात त्याला अजिबात रस नाही; पण एक दिवस त्याचे मित्र त्याला शाळेची वारी घडवतात आणि तिथे सुरू असलेली मुलांची परेड, अर्थात संचलन अशोकला आकर्षून घेते. त्याला या परेडचे नेतृत्व करावेसे वाटते; मात्र या प्रकारात गावच्या पाटलाचा मुलगा त्याच्या आड येत राहतो. परिणामी, परेड शिकण्याचे अशोकचे प्रयत्न अर्धवटच राहतात. दुसरीकडे, गावात भटकणारा एक वेडसर माणूस आण्ण्या, याचे आकर्षण अशोकला वाटत असते. तो आण्ण्याचा पिच्छा पुरवतो, तेव्हा आण्ण्या हा एकेकाळी युद्धात लढलेला सैनिक आहे हे अशोकला समजते. आता आण्ण्या त्याला परेड शिकवेल, याची अशोकला खात्री वाटू लागते. पण स्क्रिझोफेनियाच्या चक्रात सापडलेला आण्ण्या हा गावातला हेटाळणीचा विषय झालेला असतो. पुढे अशोकच्या या परेड प्रकरणावर दृष्टिक्षेप टाकत ‘म्होरक्या’ हा चित्रपट बरेच काही सांगत जातो.
लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून जबाबदारी पार पडणाऱ्या अमर देवकर यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवला आहे. महत्त्वाचे म्हणजे यातले त्यांचे दिग्दर्शकीय कसब वाखाणण्याजोगे आहे. चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममधून हा दिग्दर्शक विनासंवाद बरेच काही बोलत राहतो. अनेकदा प्रतिकात्मक बाज पकडत त्यांनी या फ्रेम्स अधिकच बोलक्या केल्या आहेत. वेडसर झाक असलेली यातली आण्ण्याची भूमिकाही त्यांनी टेचात रंगवली आहे. ज्याच्यावर या चित्रपटाचा फोकस आहे, ती अशोक ही व्यक्तिरेखा रमण देवकर याने अचूक व्यवधान राखत उभी केली आहे. मुळात या चित्रपटातले कलावंत अभिनय करतच नाहीत असे वाटते; इतक्या त्यांच्या भूमिका वास्तवदर्शी झाल्या आहेत. ऐश्वर्या कांबळे (निकिता), रामचंद्र धुमाळ (गोमतर आबा), यशराज कऱ्हाडे (बाळ्या), अनिल कांबळे (शिक्षक) या सर्वांच्या व्यक्तिरेखा लक्षात राहतात. एवढेच नव्हे; तर सुरेखा गव्हाणे आणि इतर कलावंतांच्या छोट्या छोट्या भूमिकाही चित्रपटात भरीव रंगकाम करतात.
या चित्रपटाचे कॅमेरावर्क, संकलन, कला दिग्दर्शन या बाजू नीट जमून आल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत या चित्रपटाने का झेप घेतली असावी, याचे उत्तर या चित्रपटाच्या सादरीकरणातच आहे आणि या संपूर्ण टीमने चाकोरीबाहेरचा असा एक अनुभव या ‘म्होरक्या’द्वारे दिला आहे.
Leave a Reply