नाटक परीक्षण – Don’tt worry हो जाएगा   “अंतर्मुख करणारी नाट्यकृती”

माणूस म्हटला की त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, त्याच्या जीवनात नेहमी चांगले वाईट असे प्रसंग घडत असतात.  त्यामधून मार्ग काढून तो आपले आयुष्य जगत असतो. कोणत्या वेळी कोणता प्रसंग समोर येईल हे त्याचे त्याला माहीत नसते.  आपले मित्र मंडळी नातेवाईक शेजारचे लोक कधी मदतीला येतील किंवा एखादा अनोळखी माणूस सुद्धा आपल्याला आधार देऊन कोणता चांगला मार्ग आहे असू शकतो.  समाजात जवळचे दूरचे हे कसे वागतील हे आपल्या स्वभावावर अवलंबून असतं.  अडचणीच्या वेळी शांतपणे विचार केला सकारात्मक भावना मनात आणली तर आपले काम सहज चांगले होऊ शकते.

IMG-20200217-WA0194

आपल्याला वाटते की  सगळ्या समस्या आपल्याच वाट्याला आलेल्या आहेत. बाकीचे सारे आनंदात जीवन जगत आहेत पण तसे आयुष्यात नसतं.  काहीजण आपल्या समस्या उघड करतात तर काही जण त्या कोणासमोर व्यक्त करीत नाहीत.  शेवटी सकारात्मकता मनात ठेवली तर चांगले मार्ग दिसायला लागतात.   अशा संकल्पनेवर ‘Dontt worry हो जाएगा’ हे नाटक आहे.

नाटकाचे कथानक एका चाळींमधील खोलीत घडतं. भास्कर कमलाबाई वाकडकर हा गृहस्थ चाळी मधल्या एका लहानशा खोलीत राहत असतो. आपले काम बरे की आपण बरं असे त्याचे आयुष्य सुरू असतानाच एक घटना घडते. त्या घटनेच्या दिवशी नेमकी त्या शहरात दंगल उसळलेली असते आणि त्यामुळे परिसरामधील सारं वातावरण भयभीत आणि संपूर्णपणे तणावाखाली असते, त्या चाळीचे  सेक्रेटरी चिकटे  आपल्या चाळींमधील लोकांना भेटून   धीर देण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्याच वेळी भास्कर ला भेटायला एक अनोळखी मुलगी त्याच्या घरात प्रवेश करते.  त्या मुलीचं नाव वीणा.  ही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून ती विमा पॉलिसी एजंट आहे. तिला  आपले विमा पॉलिसी चे टार्गेट पूर्ण करायचं असतं त्यानिमित्ताने ती भास्कर यांना भेटायला येते. त्यांनी पॉलिसी घ्यावी अशी विनंती करते पण भास्कर तिला सांगतो मला पॉलिसी नको आहे आणि बाहेर दंगलीचे तणावाचे वातावरण असताना तुम्ही घराबाहेर पडला कशाला ? असा प्रश्न विचारतो  पण तिला गरज असते आपले टार्गेट पूर्ण करायचे असते.  त्याच सुमारास ती  रवि नावाच्या माणसाला सतत फोन करत असते. ती आपल्या घरीसुद्धा फोन करते.  रिपोर्ट आले का ? वगैरे विचारते हे सारे भास्करच्या घरातून चाललेले असते .

IMG-20200217-WA0197

 

    भास्कर त्याकडे जास्त लक्ष देत नाही पण  एक क्षण असा येतो की भास्करला तिला काही प्रश्न विचारावेसे वाटतात,  त्यावेळी ती त्याला विश्वासाने सारं काय घडले ते सांगून टाकते आणि एक गंभीर समस्या भास्कर समोर उभी राहते.  भास्कर हा स्वतः काही समस्येमध्ये असतो पण तो तिला माणुसकी म्हणून मदत करण्याचे ठरवतो आणि शेवटी तिला तो कशाप्रकारे मदत करतो. तिला नेमकी समस्या काय असते ?  ही समस्या कोणामुळे निर्माण झालेली असते ? आई-वडिलांना ती नेमकं काय सांगते ? या सगळ्यातून तिची सुटका कशी होते ? भास्कर ची सुद्धा नेमकी काय समस्या असते ? अशा अनेक भावनिक प्रश्नांची उत्तरे या नाटकात मिळतील.

भास्कर ची भूमिका संजय खापरे यांनी छान रंगवली आहे. या भूमिकेने मधील गंभीर आणि विनोदाचे बारकावे त्यांनी सादर केले आहेत .. वीणा ची भूमिका पूर्वा फडके हिने सादर केली आहे. तिची समस्या गंभीर आहे. भूमिकेमधील  बारीक-सारीक बारकावे यामधून ती छान व्यक्त झाली आहे.  या दोन्ही भूमिका मध्यमवर्गीय माणसाचे प्रतिनिधीत्व करतात.  चाळींमधील मधील सेक्रेटरी चिकटे ही भूमिका राहुल मोहिते आणि सौ चिकटेची भूमिका आसावरी ऐवळे   हिने सादर केली असून त्यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिलेला आहे. गंभीरतेमध्ये  विनोद पेरण्याचे  काम दोघांनी सुरेख केलेआहे.

मध्यमवर्गीय माणसाच्या समस्येवर नाटक बांधले असून सकारात्मक विचार करून,  शांतपणे आलेल्या समस्येकडे बघितले तर आपल्याला यातून मार्ग मिळू शकतो,,  असा संदेश देऊन नाटक प्रेक्षकांना अंतर्मुख करायला लावते.  सकारात्मक विचार हा  मनाला नेहमी उभारी देतो.संजय खापरे यांनी हे नाटक बंदिस्त पणे सादर केल आहे,,  काही ठिकाणी नाटकाची गती संथ  होते. असे जरी असले तरी नाटक शेवटी परिणाम साधून जाते. त्याचप्रमाणे नेपथ्य,  प्रकाश योजना,  संगीत,  हे नाटकाला पूरक असे आहे.

नाटकाचे निर्माते प्रिया पाटील, श्लोक पाटील , उदय साटम हे आहेत. नाटकाची मूळ संकल्पना राहुल पिंगळे यांची असून नाटकाचे लेखन रोहित मोहिते ,, रोहित कोतेकर या दोघांनी मिळून केल  आहे.  नाटकाचे दिग्दर्शन संजय खापरे यांनी केले असून, नेपथ्य महेश धालवलकर ,  प्रकाश योजना अमोघ फडके,  संगीत मितेश चिंदरकर,  नृत्यदिग्दर्शन सिद्धेश दळवी यांनी केले आहे. या नाटकात संजय खापरे, पूर्वा फडके, रोहित मोहिते,  आसावरी  ऐवळे,  या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
दीनानाथ घारपुरे

सागर म्हणतोय, ‘इशारों इशारों में’… 

 
– राज चिंचणकर
       नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध प्रातांत मुशाफिरी करणारा अभिनेता सागर कारंडे आता ‘इशारों इशारों में’ हे नवीन नाटक घेऊन रंगभूमीवर अवतरला आहे. सागर कारंडे म्हटले की रसिकांच्या डोळ्यांसमोर त्याच्या ज्या भूमिका येतात, त्यापेक्षा वेगळी भूमिका त्याने या नाटकात रंगवली आहे. या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री संजना हिंदूपूर हिच्यासोबत सागरची जोडी जमली आहे. उमेश जगताप यांचीही या नाटकात महत्त्वाची भूमिका आहे.
Isharo3
या नाटकाचे मराठी रूपांतर स्वप्नील जाधव यांनी केले आहे. जय कपाडिया यांचे दिग्दर्शन या नाटकाला लाभले असून, अजय कासुर्डे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. ‘सरगम क्रिएशन’ या संस्थेतर्फे हे नाटक रंगभूमीवर आले आहे. नेहमीच्या परिचयाच्या विषयांपेक्षा वेगळा विषय या नाटकाद्वारे या टीमने हाताळला आहे.

रंगभूमीवर आता ‘यदाकदाचित रिटर्न्स’चा ‘संतोष’…! 

– राज चिंचणकर
       संतोष पवार हा मराठी रंगभूमीवरचा एक अवलिया कलावंत!  त्याच्या कारकिर्दीत त्याने विविध प्रकारची नाटके गाजवली असली, तरी सुमारे २० वर्षांपूर्वी आलेले ‘यदाकदाचित’ हे त्याचे नाटक रंगभूमीवर धमाल उडवणारे ठरले होते. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून पुढे प्रसिद्धीस आलेल्या संतोष पवारने या नाटकाचे सुमारे चार हजार प्रयोग केले होते. विनोदाचा धिंगाणा घालणारे हे नाटक त्यावेळी तुफान लोकप्रिय झाले होते. नंतर काही कारणास्तव या नाटकावर पडदा पडला होता. परंतु, संतोष पवारच्या मनातून हे नाटक काही केल्या जात नव्हते. त्याच्या या अस्वस्थतेतूनच त्याच्या ‘यदाकदाचित रिटर्न्स’ या नवीन नाटकाचा जन्म झाला असावा.
YD (6)
       येत्या १८ मे रोजी संतोष त्याचे हे नवीन नाटक रंगभूमीवर आणण्यास सज्ज झाला आहे. अनेक लोकप्रिय नाटके देणारी ‘श्री दत्त्तविजय प्रोडक्शन’ ही प्रतिष्ठित नाट्यसंस्था ‘यदाकदाचित रिटर्न्स’ हे नाटक रंगभूमीवर आणत आहे. या नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व गीते अशी जबाबदारी संतोष पवार यानेच सांभाळली आहे. ज्येष्ठ निर्माते दत्ता घोसाळकर यांच्यासह अजय पुजारी (नेपथ्य), चेतन पडवळ (प्रकाशयोजना), प्रणय दरेकर (संगीत) अशी टीम या नाटकासाठी कार्यरत झाली आहे. विशेष म्हणजे काही नाटके, चित्रपट, मालिकांमध्ये चमकलेले तब्बल १६ युवा कलाकार या नाटकात भूमिका रंगवत आहेत. या नाटकाची तालीम सध्या जोरात सुरु असून, रसिकांना संतोषकडून हे ‘रिटर्न गिफ्ट’ मिळण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे.

ज्येष्ठ मंडळींसाठी ‘मी.. माझे.. मला…’ नाटकाचा पुढाकार…! 

– राज चिंचणकर
       सध्याच्या काळात स्वतःची मुले असूनही, आई-वडिलांना आश्रितासारखे जगावे लागते. अशा काही घटना समाजात प्रकर्षाने दिसून येतात. याबाबत समाजाला जागृत करण्यासाठी ‘मी.. माझे.. मला…’ या नाटकाने पुढाकार घेतला आहे. आत्मकेंद्रित वृत्तीच्याही पलीकडे जाऊन आपण समाजाचे काही देणे लागतो, असा सुसंस्कार करणारे हे नवीन नाटक आता रंगभूमीवर आले आहे.
MM4
       या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केले असून, विजय गोखले यांनी दिग्दर्शन केले आहे. किशोर सावंत आणि विवेक नाईक यांच्या ‘किवी प्रॉडक्शन्स’ या नाट्यसंस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. विघ्नेश जोशी, विजय गोखले, किशोर सावंत, विलास गुर्जर, सुरेखा कुडची, हेमांगी राव आणि रोहित मोहिते यांच्या या नाटकात भूमिका आहेत. अनिकेत  शुभम यांचे संगीत, देवाशिष भरवडे यांचे नेपथ्य, अमोघ फडके यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. या नाटकाचे व्यवस्थापन प्रवीण दळवी यांनी सांभाळले आहे.
       याबाबत बोलताना नाटकाचे निर्माते किशोर सावंत सांगतात, ज्येष्ठ मंडळींचा हा विषय समाजासमोर येणे आवश्यक वाटल्याने आणि लेखक आनंद म्हसवेकर यांच्या लेखनात मला हा मुद्दा स्पष्ट दिसल्याने मी या नाटकाची निर्मिती करायची ठरवली. वृद्धांच्या समस्या पाहता मनाला फार क्लेश होतो. हा विषय समाजापुढे मांडावा असे मला मनापासून वाटले म्हणून मी या नाटकाच्या निर्मितीला हात घातला.
       दिग्दर्शक विजय गोखले म्हणतात, पंख फुटलेल्या मुलांचे त्यांच्या आई-वडिलांविषयी काही कर्तव्य आहे की नाही? हे मांडण्यासाठी नाटकासारखे उत्तम व्यासपीठ नाही. नाटकाचा विषय मला खूप भावला आणि म्हणून मी हे नाटक दिग्दर्शित करायचे नक्की केले. स्वतःपलीकडे जाणारे, सामाजिक भान जपणारे हे नाटक आहे.
       सध्या कुटुंबव्यवस्था ढासळत चालली आहे. एकत्र कुटुंबपद्धती नाहीशी होत चालली आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली आहे. हीच आपली कौटुंबिक प्रगती आहे का; असा प्रश्न उपस्थित करत, वृद्धापकाळात आपल्याला मुलांनी सांभाळावे यासाठी ज्येष्ठ मंडळींना कोर्टात जावे लागते, ही आपल्या संस्कृतीची व संस्कारांची हार आहे असे लेखक आनंद म्हसवेकर याविषयी संवाद साधताना स्पष्ट करतात.

रंगभूमीवर आता ‘डायनासॉर’ची एन्ट्री…! 

 
– राज चिंचणकर
       रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, अशोक पावसकर  या व अशा अनेक ज्येष्ठ मंडळींनी बालरंगभूमी खर्‍या अर्थाने समृद्ध केली. परंतु आधुनिक काळाच्या ओघात बालरंगभूमीला उतरती कळा लागली. साहजिकच, बालनाट्ये टिकवून धरण्यासाठी विविध संकल्पना राबविणे आवश्यक ठरले. रंगभूमीवर अनेक अचाट अशा कल्पना प्रत्यक्षात उतरवलेल्या दिसतात. विशेषतः बालनाट्यांच्या माध्यमातून याची प्रामुख्याने प्रचिती येते. याच मांदियाळीत रंगभूमीवर आता थेट ‘डायनासॉर’ची एन्ट्री होणार आहे.
JB
       मोहन चोरघे व प्रीती दळवी-चोरघे यांनी ‘जंगलबुक’ या त्यांच्या बालनाट्यातून डायनासॉर हे पात्र रंगमंचावर आणण्याचा संकल्प केला आहे. ‘इवा’ असे नामकरण असलेल्या या डायनासॉरची लांबी २० फूट आहे. आकर्षक पद्धतीने हा डायनासॉर तयार करण्यात आला आहे. या डायनासॉरसोबत ७ फूट उंची असलेला गोरिलाही या नाटकातून रंगमंचावर अवतरणार आहे. ‘बुबो’ असे या गोरिलाचे नाव आहे. विशेष म्हणजे, डायनासॉर आणि गोरिलाच्या माध्यमातून वन्यप्राणी संरक्षण, पर्यावरण आदी विषयांनाही या नाटकातून वाचा फोडण्यात येणार आहे.

संजय नार्वेकर म्हणतो,  कुरुपतेचा न्यूनगंड कशाला…? 

hkv
– राज चिंचणकर
       प्रत्येक माणसात काही ना काही टॅलेंट असतेच. फक्त ते बाहेर येणे आवश्यक असते. माणसात दडलेले हे टॅलेंट बाहेर आले, तर तुम्ही तुमच्या न्यूनगंडावर आपसूक मात करू शकाल. महत्त्वाचे म्हणजे कुरुपतेचा न्यूनगंड कशाला बाळगायचा, असा प्रश्न अभिनेता संजय नार्वेकर यांनी विचारला आहे. ‘होते कुरूप वेडे’ हे त्यांचे नाटक सध्या रंगभूमीवर आले आहे आणि त्याचा संदर्भ पकडत संजय नार्वेकर यांनी रसिकांना खडबडून जागे केले आहे.
       ‘होते कुरूप वेडे’ या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केले आहे. या नाटकात मुख्य भूमिका संजय नार्वेकर साकारत आहेत. त्यांच्या सोबत नयन जाधवभारत सावलेशलाका पवारनितीन जाधवमिनाक्षी जोशीकल्पेश बाविस्कर हे कलाकार या नाटकात भूमिका रंगवत आहेत. या नाटकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे संजय नार्वेकर यांचे हे २५ वे नाटक आहे. तर राजेश देशपांडे यांनीही या नाटकाच्या निमित्ताने पंचविशी गाठली आहे. 
both copy
       या नाट्यलेखनाच्या निमित्ताने बोलताना राजेश देशपांडे म्हणतात, प्रत्येकाने स्वतःमध्ये काय आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. कुणीही कुणाच्या वरवरच्या रूपावर जाऊन मत बनवू नये. ओशो म्हणतात, ‘बी युवरसेल्फ!’ आपण सतत दुसऱ्यासारखे व्हायला बघतो, हे चुकीचे आहे. दुसऱ्यांशी तुलना करण्याने माणूस दुःखात बुडत जातो. प्रत्येकाने स्वतःमधला राजहंस शोधायला हवा. प्रत्येकाला निसर्गाने काहीतरी दिले आहे आणि ते ओळखून माणसाने जीवनक्रम ठरवायला हवा.

संजय – राजेश पंचविशीत

मराठी रंगभूमीवर वेगवेगळे नाट्यप्रयोग सातत्याने होत असतात. आपल्याकडे जे चांगलं आहे, त्यापेक्षा दुसऱ्यांकडे काय आहे ते जाणून घेण्यासाठी व जे नाही ते मिळवण्यासाठी माणूस नेहमीच धावत असतो.’ याच मनोवृत्तीवर अत्यंत मार्मिक भाष्य करणारे होते कुरूप वेडे हे धमाल विनोदी नाटक लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे लवकरच रंगभूमीवर घेऊन येत आहेत.

‘वरवरच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य महत्त्वाचं ते जपा’ असा संदेश देणारं हे नाटक आहे. या नाटकात प्रमुख भूमिकेत आहेत प्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर.  विशेष म्हणजे या नाटकाद्वारे संजय नार्वेकर ‘पंचविशीत’ पदार्पण करतायेत. अंहं…दचकू नका !! ‘पंचविशीत’ म्हणजे होते कुरूप वेडे हे त्यांचं रंगभूमीवरचं पंचविसावं नाटक आहे. या सोबत आणखी एक सुरेख योगायोग म्हणजे या नाटकाचे लेखक दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचेही हे पंचविसावं नाटक आहे.

संजय आणि मी अनेक वर्ष एकत्र काम करत असून होते कुरूप वेडे च्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करतोय. इतक्या वर्षांचा दोघांचा हा अनुभव या नाटकाला नक्कीच वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल’ असा विश्वास राजेश देशपांडे यांनी व्यक्त केला. तर ‘राजेश सारख्या दिग्दर्शकासोबत काम करणे म्हणजे नवीन गोष्टी शिकण्याची एक चिरंतन प्रक्रिया असते, या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राजेश सोबत काम करायला मिळाले ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे’. अशा भावना अभिनेता संजय नार्वेकर यांनी व्यक्त केल्या. संजय नार्वेकरांसोबतच नयन जाधव,भारत सावलेशलाका पवारनितीन जाधवमिनाक्षी जोशीकल्पेश बाविस्कर हे कलाकार नाटकात भूमिका साकारणार आहेत.  लवकरच हे नाटक रंगभूमीवर येत आहे.both copy

‘कुटुंब रंगलय काव्यात’ चा ३०००वा महोत्सवी प्रयोग

वाक्यम रसात्मकं काव्यं’– रसपूर्ण वाक्याला काव्य म्हणतात‘. असं म्हणत गेली ३८ वर्षे रसपूर्ण काव्यांची ही गंगा अविरतपणे रसिकांसमोर आणण्याचं काम विसुभाऊ बापट यांनी केले आहे. ओंकारसाधना, मुंबई निर्मित कुटुंब रंगलय काव्यात‘ या एकपात्री काव्यनाट्यानुभवाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कवितेचे बीज नव्याने रोवले. अनेक प्रस्थापितनवोदित कवींच्या अनेक प्रकाशित आणि अप्रकाशित कवितांचा संच घेऊन तीन दशकांहून अधिक काळ विसुभाऊ बापट कुटुंब रंगलय काव्यात‘ हा एकपात्री कार्यक्रम करत आहेत. एकही कवितेची पुनरुक्ती न करता कविता पाठ करून सलग ११ तास आणि १५ तास कवितांचे सादरीकरण करण्याचा विक्रम विसूभाऊंच्या नावावर आहे.

1

मुंबई निर्मित कुटुंब रंगलय काव्यात या एकपात्री काव्यनाट्यानुभवाचा ३०००वा महोत्सवी कार्यक्रम रविवारी ६ जानेवारीला रात्री ८.०० वाजता शिवाजी मंदिरदादर  येथे आयोजित करण्यात आला आहे. लोकमान्य मल्टिपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि औदुंबर आर्टस् या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विसुभाऊ बापट, शब्द आणि सुरांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना कवितेच्या अद्भुत जगाची सफर घडवणार आहेत.

नाटक : एपिक गडबड – भन्नाट मॅडचॅप नाट्यकृती

दीनानाथ घारपुरे

   जग हि एक रंगभूमी आहे आणि आपण सर्व वेगवेगळ्या भूमिका रंगवणारी पात्रे आहोत, आपले कर्म करताना धडपड करीत असतांना अनेकदा गडबड होते आपल्या चांगल्या वाईट क्षणात आपण आनंद शोधायला सुरवात करतो. आपण ठरवतो एक आणि समोर काही वेगळेच येते आणि मग धमाल गडबड सुरु होते.

Natak Epic Gadbad Photo.2

    एपिक गडबड ह्या नाटकात “ नाटक “ सादर केल आहे. आणि हि गंमत अनुभवण्या सारखी आहे. एका कुटुंबाची कथा नाटकात सुरु झालेली असते, मामाच्या भाचीचे लग्न ठरवायचे असते, मामाची इच्छा आहे कि आपली रूढी / परंपरा जपणारा असा नवरा तिला मिळावा, तो एक ऐतिहासिक पुरुष असावा, त्यासाठी मामा त्याची भाची आरती, बाब्या नावाचा घरगडी,आरतीची आई ज्योती, अशी हि पात्रे नवरा मुलगा कुमार पेशवा कधी येईल याची वाट पाहत असतात. पण त्याचवेळी तिथे विल्यम शेक्सपिअर हा अचानक येतो. आणि मग गडबड गुंतागुंत, विनोद अशी नाट्यमय प्रसंगाची बरसात व्हायला सुरवात होते. गंमत म्हणजे लग्नाळू मुलगी आरती हि शेक्सपिअरच्या    प्रेमात पडते आणि अचानक गडबड अधिकच वाढते, आता हे सारे कथानक मी काही सांगणार नाही तुम्हीच नाट्यकृती चा अनुभव घ्या.

Natak Epic Gadbad Photo

      मामा, ज्योतीताई, आरती, कुमार पेशवा, बाब्या, विल्यम शेक्सपियर ह्या व्याकीतेखा भिन्न / भिन्न स्वभावाच्या आहेत. मामा हे स्वतःला प्रमुख पात्र समजत असतात पण लेखकाच्या मनात { नियतीच्या मनात } काही वेगळेच असते. आरती हि आजच्या तरुणीचे प्रतिनिधित्व करणारी आहे, बाब्या हा तरुण मुलगा नवीन योजना राबवणारा, त्याचा शोध घेणारा आहे, ज्योतीताई हि स्वभावाने प्रेमळ असून सर्वाना ती मदत करीत असते, कुमार पेशवा हा आजच्या तरुणाचे प्रतिनिधित्व करतो, विल्यम शेक्सपिअर हे जुन्या काळातले व्यक्तिमत्व नाटकाची उत्कंठा वाढवते.

      नाटकात सर्वच व्यक्तिरेखा प्रमुख आहेत. त्यांच्या भोवती नाटक फिरते. सर्वांचे टीमवर्क उत्तम आहे. देशपांडे नावाच्या नाटककाराने आपली मनातील पात्रे रंगभूमीवर आणली असून त्या व्यक्तिरेखा कलाकारांनी छान रंगविल्या आहेत. नाटकातले नाटक हा एक धमाल प्रकार आहे. दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनी हा प्रयोग अत्यंत बंदिस्तपणे आणि गतिमानता ठेवून सादर केला आहे. या नाटकात पेशवाई, शेक्सपिअर काळ आणि वर्तमान यांचे उत्तम चित्रण उभे केलेय. नाटकाचे नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीत हि नाटकाची जमेची बाजू आहे.

विल्यम शेक्सपिअर तेथे का येतो ? कुमार पेशवा आणि आरतीचे लग्न होते का ? बाकीची पात्रे लग्न होण्यासाठी कोणता खेळ खेळतात ? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे नाटकात मिळतील.

नरेन चव्हाण सादर करीत आहेत आणि अभिजित साटम प्रस्तुत “एपिक गडबड “हि नाट्यकृती. निर्माते ऋजुता चव्हाण, मकरंद देशपांडे हे आहेत. लेखन / दिग्दर्शन मकरंद देशपांडे यांचे असून नेपथ्य टेडी मौर्या, प्रकाश योजना अमोल फडके यांचे आहे. रचिता अरोरा यांचे संगीत असून यामध्ये अंकित म्हात्रे, निनाद लिमये, आकांक्षा गाडे, माधुरी गवळी, भरत मोरे, अजय कांबळे या कलाकारांनी भूमिकेंना न्याय दिला आहे.  अजय कांबळेची अभिनयऊर्जा अप्रतिम.

   एक हटके अनुभूती देणारी हि नाट्यकृती आहे. अशा ह्या नवीन प्रयोगाचे स्वागत करायला हवे.

‘तेरा दिवस प्रेमाचे’ नाटकाची पंचविशी…! 

– राज चिंचणकर

       रंगभूमीवर येऊन अल्पावधीतच २५ प्रयोगांना गवसणी घालण्याचे कार्य ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाने केले आहे. गंभीर विषयाला विनोदाची डूब असा बाज असलेल्या या नाटकाचा रौप्य महोत्सवी प्रयोग यशवंत नाट्यगृहात मोठया उत्साहात रंगला. या प्रयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेची टीम यावेळी उपस्थित होती. अभिजीत खांडकेकर, अनिता दाते, मिहीर राजदा, रोहिणी निनावे आदी कलावंतांनी या प्रयोगाचा आस्वाद घेतला. या टीमच्या हस्ते ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकातल्या कलाकारांचा आणि बॅकस्टेज कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
13D2
       अभिनेते विजय पाटकर यांच्यासह नानूभाई जयसिंघानी आदी मान्यवरही या प्रयोगाला उपस्थित होते. या नाटकाची निर्मिती अनुराधा सामंत यांची आहे. आनंद म्हसवेकर यांनी या नाटकाचे लेखन केले असून, शिरीष राणे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. अरुण नलावडे, माधवी दाभोळकर, शर्वरी गायकवाड, देवेश काळे, सुचित ठाकूर, नीता दिवेकर, संजय देशपांडे हे कलाकार या नाटकात भूमिका रंगवत आहेत. प्रयोगांची पंचविशी पार केल्यावर आता या नाटकाची पन्नासाव्या प्रयोगाकडे जोमाने घौडदौड सुरु झाली आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑